स्वारगेट येथे वाहनतळ उभारण्याच्या महापालिकेच्या योजनेपेक्षाही कमी खर्चात वाहनतळ उभारला जाऊ शकतो, असा दावा ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी केला आहे. पुणे शहराच्या हद्दीतून वाहणाऱ्या कॅनॉलमधील पाणी जलवाहिनीच्या माध्यमातून कॅन्टोन्मेंट पर्यंत पोहोचवून या कॅनॉलच्या ठिकाणी वाहनतळ उभारण्याची योजना त्यांनी मांडली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोटय़वधी रुपये खर्च करून स्वारगेट चौकाजवळ वाहनतळ उभारण्यात येणार आहे. मात्र, कमी खर्चातही ही योजना होऊ शकते असा दावा आढाव यांनी केला आहे. स्वारगेट एस. टी. स्टँड ते पीएमपीएमएल बस थांब्याच्या दक्षिण बाजूने कॅनॉल वाहतो. या कॅनॉलची सुरुवात खडकवासला धरणापासून होते. शहराच्या हद्दीत सिंहगड रस्ता, पर्वती पायथा, दांडेकर पूल, स्वारगेट, डायस प्लॉट, कॅन्टोन्मेंट असा या कॅनॉलचा प्रवाह आहे. हे पाणी कॅन्टोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्र, हडपसर, मांजरीमार्गे शेतीला पुरवले जाते. शहराच्या हद्दीतून वाहणाऱ्या कॅनॉलमधील पाणीही पाईपद्वारे कॅन्टोन्मेंटपर्यंत नेल्यास वाहनतळासाठी मोठय़ा प्रमाणात जागा उपलब्ध होऊ शकेल. या जमिनीवर कोठेही पक्क्य़ा बांधकामासाठी परवानगी देण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे शंकरशेठ रस्ता, सावरकर रस्ता या ठिकाणी कॅनॉलवर पूल बांधल्यास वाहतूकही विरळ आणि सुरळीत होऊ शकेल, असे आढाव यांनी म्हटले आहे.