‘जागतिकीकरणानंतर देशासमोर उभी राहणारी आव्हाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखली होती. त्यांनी मांडलेले विचार आजही दिशादर्शक आहेत. डॉ. आंबेडकर यांनी आर्थिक विषयांवर लिहिलेल्या लेखांवर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केले.
सिम्बायोसिस संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या उद्घाटन समारंभात फडणवीस बोलत होते. या वेळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, खासदार रामदास आठवले, डॉ. आंबेडकर संग्रहालयाच्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, संस्थेच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते.
या वेळी फडणवीस म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विलक्षण प्रतिभा असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या योगदानातून उभे राहिलेले भारताचे संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधानांपैकी एक आहे. डॉ. आंबेडकरांचा द्रष्टेपणा त्यांच्या आर्थिक विषयांवरील लेखांमधूनही दिसून येतो. त्यांनी सामाजिक विषयांवर लिहिलेल्या लेखांवर ज्या प्रमाणे संशोधन होते. त्याचप्रमाणे अर्थकारणावरील लेखांवरही संशोधन होणे गरजेचे आहे.’
या वेळी प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, ‘कोणताही धर्म वाईट शिकवण देत नाही. मात्र, धर्माच्या नावाखाली अनेक चुकीच्या गोष्टीही करतो. सध्या जगभर गाजणारी आयएसआयएस ही धार्मिक विकृती आहे. काही वर्षांपूर्वी डॉ. आंबेडकर यांनी धर्मातील चुकीच्या गोष्टी समोर आणल्या. डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक-आर्थिक विचारांनीच या देशाला दिशा दिली.’
आठवलेंची कविताच चर्चेची…
‘जसा पाण्यावर तरंगतो ‘फिश’,
तसे शिक्षणात तरंगते सिम्बायोसिस
यापुढे मी करणार नाही मुजुमदार फॅमिलीला ‘मिस’
प्रतिभाताई पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना करतो जय भीम ‘विश’

या रामदास आठवले यांच्या कवितेची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली.