लहान बाळांमध्ये योनीमार्ग एकमेकांवर चिकटलेला असण्याची तक्रार दुर्मिळ नसून त्यावरील शस्त्रक्रियाही सोपी आहे. परंतु अनेक वेळा बाळांच्या पालकांना त्याबाबत काहीच माहिती नसल्यामुळे ते प्रचंड  घाबरून जाऊनच डॉक्टरांकडे येतात, असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे. जळगावमधील एका नऊ महिन्यांच्या मुलीची ही शस्त्रक्रिया ससून रुग्णालयात मंगळवारी करण्यात आली. या शस्त्रक्रियेबाबत रुग्णालयातील डॉक्टरांनी माहिती दिली.
रुग्णालयातील बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. संध्या खडसे यांनी या बाळाची तपासणी केली होती. लहान बाळाचा योनीमार्ग बंद असण्याबाबतच्या तक्रारींचे दोन प्रकार आहेत, असे ससून रुग्णालयातील बालरुग्ण शस्त्रक्रिया विभागाचे प्रो. डॉ. दशमीत सिंग यांनी सांगितले. एका प्रकारात योनीमार्ग विकसित झालेला नसतो (व्हजायनल अट्रिसिया) व हा प्रकार तुलनेने दुर्मिळ असतो, तर दुसऱ्या प्रकारात बाळामधील ‘हार्मोनल इम्बॅलन्स’मुळे योनीमार्ग एकमेकांवर चिकटलेला (लेबिअल सायनिके) असतो. ही तक्रार बऱ्याच बाळांमध्ये आढळते. त्याची शस्त्रक्रियाही सोपी- काही मिनिटांत होऊ शकणारी आहे व ती भूल देऊन करतात. शस्त्रक्रियेनंतरही बाळाच्या शरीरात संप्रेरकांची कमी-जास्त झालेली पातळी तशीच राहते, त्यामुळे त्यावर काही विशिष्ट औषधे दिली जातात.
डॉ. सिंग म्हणाले,‘‘या दोन्ही प्रकारांमध्ये बाळाचा योनीमार्ग बंद असल्यासारखे दिसते आणि त्यामुळे पालक घाबरेघुबरे होतात. ससूनमध्ये शस्त्रक्रिया झालेल्या बाळाच्या पालकांनाही बाळाचा योनीमार्ग बंद असल्याचेच वाटले होते व त्यामुळे ते चिंतित होते. बाळाला अशी काही तक्रार आहे का ते पालकांनी बाळाच्या अगदी लहानपणीच पाहणे आवश्यक आहे. अनेक बाळांमध्ये ते लक्षात येत नाही व बाळाला त्रास होऊ शकतो. निदान लवकर झाले तर पुढील गुंतागुंत टाळता येते.’’