बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवाचा शोभायात्रेने प्रारंभ

ढोल-ताशांचा निनाद.. झांजपथकातील कलाकारांचा उत्स्फूर्त नृत्याविष्कार.. मधुर सुरांवटींचा अनुभव देणारे बँडपथकातील कलाकारांचे वादन..बालगंधर्व यांच्या स्त्री आणि पुरुष भूमिकेतील पेहराव करून आलेल्या कलाकारांना पाहण्यासाठी झालेली गर्दी.. पावसाची रिमझिम सर आणि नाटय़-चित्रसृष्टीतील कलाकारांचा वाढलेला उत्साह.. अशा प्रसन्न वातावरणात एकीकडे पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांचे अनुकरण करीत नाटय़पंढरीच्या वारकऱ्यांनी शनिवारी दिमाखदार दिंडी काढली. बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांचा प्रारंभ या देखण्या शोभायात्रेने झाला. बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त बालगंधर्व परिवारातर्फे आयोजित कार्यक्रमांची सुरुवात या शोभायात्रेने झाली. ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, जयमाला इनामदार, भारती गोसावी, सीमा चांदेकर, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे, सुनील गोडबोले, दिलीप हल्ल्याळ, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, उद्योजक कृष्णकुमार गोयल, मेघराज राजेभोसले, सुनील महाजन, नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, प्रदीपकुमार कांबळे, मोहन कुलकर्णी यांच्यासह हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवरील कलाकार, पडद्यामागील कलाकार या िदडीमध्ये सहभागी झाले होते. ज्येष्ठ रंगकर्मीनी घंटा वाजविली आणि बालगंधर्व रंगमंदिरापासून या शोभायात्रेला सुरुवात झाली.

ढोल-ताशा पथकांचा निनाद, झांजपथकातील कलाकारांचा उत्कृष्ट खेळ, प्रभात आणि स्वराज बँडपथकांच्या सुरेल वादनाने दिंडीमध्ये रंग भरला गेला. बालगंधर्व यांची स्त्री वेशामधील भूमिका कृष्णा लोहगावकर आणि पुरुष वेशातील भूमिका प्रदीप खाडे यांनी साकारली होती. त्यांची छायाचित्रे टिपताना अनेकांना या कलाकारांसमवेत ‘सेल्फी’ काढण्याचा मोह आवरता आला नाही. संगीत रंगभूमीवरील बालगंधर्व यांच्या विविध भूमिकांसह मराठी रंगभूमीचा प्रवास मांडणारे चित्ररथ हे या िदडीचे वैशिष्टय़ ठरले.