एखाद्या व्यवसायासाठी, पूरक सेवा देणाऱ्या मंडळींचीसुद्धा, एखादी बाजारपेठ तयार होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे बुरुड मंडळी! फळे, भाजीपाला यांच्या सुलभ वाहतुकीसाठी तसेच पॅकिंगसाठी, मुख्यत्वे बांबूपासून तयार केलेल्या टोपल्यांचा वापर, असे सर्वसाधारण दृश्य स्वरूप जनतेच्या मनात असते. मात्र, माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत, सणवार, रीती, परंपरा तसेच वाद्ये, भांडी, भाजीपाला, लोककला, नृत्ये, सजावटीच्या वस्तू यामध्ये मुक्तपणे बांबूचा वापर दैनंदिन जीवनात आढळतो. बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याच्या व्यवसायात, मुख्यत्वे बुरुड मंडळी आहेत. पूर्वापार चालत आलेला व्यवसाय, अडीअडचणी, नवे प्रवाह आणि काळाच्या कसोटीवर सर्वमान्य ठरलेली, व्यवसायाची उपयुक्तता असे बरेच काही बुरुड व्यावसायिकांशी साधलेल्या संवादातून स्पष्ट झाले.

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती
Using skin lightening cream can cause kidney cancer
सावधान! त्वचा उजळणारे क्रिम वापरताय तर हे नक्की वाचा…

भाजीपाला, फळे, धान्य यांच्या वाहतुकीसाठी पूर्वापार, बांबूपासून तयार केलेले हारे, टोपल्यांचा वापर होत असे हे गृहीत मान्य केले, की संस्कृतीशी या व्यवसायाची नाळ जुळल्याचे लक्षात येते. पुण्यनगरीचा विचार केला तर मुळामुठेच्या काठी वसलेल्या पुण्याचा जसा विकास होत गेला तसे धान्य, भाजीपाल्याची विक्री केंद्रे देखील स्थलांतरित होत गेली. कसबा पेठेच्या वेशीतील भाजी मंडई, शनिवारवाडय़ाच्या पटांगणात, तेथून सध्याच्या महात्मा फुले मंडईमध्ये, नंतर मार्केट यार्ड आणि आता पुढच्या टप्प्यात, चौथ्या स्थलांतराकडे वाटचालीच्या प्रतीक्षेत असा हा आलेख आहे. पूरक सेवा देणारी बुरुड मंडळीसुद्धा याच आश्रयाने व्यवसाय विस्तारत गेली. सद्य:स्थितीत, मुख्यत्वे फुले मंडई परिसरात बुरुड मंडळींची घरे दृष्टीस पडत असली, तरी गणेश पेठ, बोंबील मार्केट, धनकवडी, हडपसर, लोहियानगर या परिसरात व्यवसाय विकेंद्रित असल्याचे समजले. पुणे शहर आणि परिसरात या व्यावसायिकांची सुमारे तीन हजार कुटुंबे राहतात. शासनाच्या दृष्टीने हा समाज अनुसूचित मागास जाती या प्रकारात येतो.

महात्मा फुले मंडईतील समाजमंदिरामध्ये बुरुड समाजातील बुजुर्ग मंडळी आणि कार्यकर्त्यांशी, गप्पांच्या निमित्ताने संवाद साधला. राजेंद्र सकपाळ, जनार्दन मोरे, सोमनाथ मोरे, राजेंद्र साळुंके, गंगाराम पवार, सोमनाथ सूर्यवंशी, सुनील मोरे अशा सर्वानी पुण्यातील त्यांच्या व्यवसायाच्या आठवणी जागवल्या आणि र्सवकष माहितीबरोबर समाजबांधवांचे कार्य आणि उज्ज्वल भवितव्याची दिशा स्पष्ट केली.

दैनंदिन जीवन, संस्कृतीतील चालीरीती, सणवार याबरोबर जन्मापासून मृत्यूपर्यंत बुरुड व्यवसाय कसा निगडित आहे याची माहिती राहुल सूर्यवंशी याने दिली. बाळाच्या जन्मावेळी, नाळ कापण्यासाठी बांबूच्या धारदार तुकडय़ाचा (बेळसा) वापर होत असे, तसेच अंत्यविधीसाठी बांबूचीच तिरडी बांधली जाते. लग्नकार्यात आजही सूप, दुरडीचे स्थान टिकून आहे. मंडप उभारणीसाठी, वासे आणि बांबूचा भरभक्कम आधार असतो. चैत्रपाडव्याची गुढी ही बांबूचीच आणि मिरवणुकीतील ध्वजाची काठीसुद्धा त्याचीच असते. गणपतीची सजावट आणि मखरे यासाठी बांबूचा वाढता वापर आहे. घटस्थापनेसाठी परडी, दिवाळीमध्ये आकाशदिवे तयार करण्यासाठी बांबूचा वापर धार्मिकतेने टिकून आहे. मोहरमचे ताबूत तसेच ख्रिश्चन धर्मातील काही रीतिरिवाजांमध्ये बांबूचा वापर होतो. छटपूजेतही बांबूचे स्थान अढळ आहे. फुलांचे गुच्छ, उदबत्ती आणि आइस्क्रीम, बर्फाचे गोळे या व्यवसायासाठी बांबूच्या काडय़ा आधारभूत ठरतात. पुष्पसजावटीसाठी, नक्षीदार आकार करताना बांबूचा वापर वाढतो आहे. बांबूच्या कोंबाची भाजी आणि त्यामध्ये वाफवलेला भात हे पंचतारांकित हॉटेलमध्ये मेनूकार्डवरील लक्षवेधी पदार्थ ठरत आहेत. नैसर्गिक जंतुनाशकता विचारात घेता काही औषधोपचारांमध्ये बांबूच्या गुणधर्माचा वापर केला जातो. पूवरेत्तर भागात दैनंदिन वापरातील भांडी, अवजारे बांबूचीच आहेत. सर्वत्र वापरली जाणारी शिडी हेसुद्धा बांबू उत्पादन आहे.

कोणत्याही व्यावसायिकांची संघटना ही त्यांच्या व्यापाराबरोबर, वैयक्तिक आणि सामाजिक विकासासाठी उपयुक्त ठरत असते. पुणे जिल्हा बुरुड समाज संस्थेची स्थापना १९८८ मध्ये झाली. तालुकानिहाय २१ विभाग असून, प्रत्येक कार्यकारिणीवर सोळा सदस्य असतात. सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक कार्याबरोबर वधू-वर मेळावे, विद्यार्थी मदत, गुणगौरव हे उपक्रम राबवले जातात. समाजातील बुजुर्गाच्या माध्यमातून तंटामुक्तीचे प्रत्न होतात, मात्र शिक्षेचे परिमाण इथे नसते. Bamboo Upgrading Research & Utility Development (BURUD) या संस्थेमार्फत व्यवसाय प्रशिक्षण, नवे प्रवाह, वस्तूंची प्रदर्शने इ. उपक्रम घेतले जातात. लाकडाला पर्याय म्हणून गेल्या काही दशकांत बांबूचा वापर वाढतो आहे, तसेच स्लॅब तयार करताना स्टीलऐवजी बांबूच्या वापराचे प्रयोग चालू आहेत, असे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सकपाळ यांनी सांगितले. पूर्वापार कागदनिर्मितीबरोबर आता बांबूपासून कापडनिर्मिती देखील होत आहे, अशी माहिती मिळाली.

बांबूची आघात क्षमता, लवचिकपणा, हलकेपणा आणि शोषकता या गुणांचा इतर क्षेत्रांतही कौशल्याने वापर केल्याची उदाहरणे आहेत. बासरी, सारंगी या वाद्यांची निर्मिती बांबूच्या माध्यमातूनच झाली. चर्मवाद्यांवर आघातासाठी बांबूचाच वापर होतो. भूकंपविरोधक घरे उभारताना बांबूला प्राधान्य दिले जाते. प्रशासनासाठी, सुरक्षारक्षकांच्या हाती हेच हत्यार असते. भव्य वास्तूंच्या अंतर्गत सजावटीसाठी, बांबूच्या कलात्मक वस्तूंचा वापर वाढत आहे, असे चेतन पवार याने सांगितले. बांबू ही वनस्पती, गवत या प्रकारात असल्याने वृक्षतोडीचे कायदे या क्षेत्राला लागू नाहीत, तसेच झपाटय़ाने वाढ होत असल्याने पुरवठा मुबलक होत असतो, अशी माहिती मिळाली.

बांबू व्यावसायिकांना माल पुरवठा मुख्यत्वे मावळ, कोकण, भोर, वेल्हा परिसरातून होतो. आसाम, मिझोराम भागांतही मोठय़ा प्रमाणावर उत्पादन होते. मेस, हुडा, मानगा, काटीकळक, चिवारी, ढोपील अशी बांबूच्या प्रजातींची काही नावे समजली. हलक्या घरांच्या निर्मितीसाठी जपान, चीन, इंडोनेशिया, कोरिया तसेच बाली, सुमात्रा बेटांवर बांबूचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. तेथील लोकनृत्ये आणि अलंकारांवर बांबूचा प्रभाव दिसून येतो. बोलीभाषांमध्ये, वाक्प्रचार, म्हणी इ.मध्ये बांबू आणि आनुषंगिक वस्तूंचा उल्लेख अनेक वेळा आढळतो.

शासकीय सोयीसुविधा तसेच स्वगुणांवर जिद्दीने प्रतिष्ठा मिळवलेल्या अनेकांची नावे या निमित्ताने समजली. हरिभाऊ मोरे यांचा स्वातंत्र्यलढय़ात सहभाग होता. व्यंकप्पा आणि महादू बुरुड हे नामांकित कुस्तीगीर होते. कलाक्षेत्रामध्ये बाळ पळसुले, देवदत्त नागे, वीणा जामकर तसेच प्रशासकीय सेवेमध्ये पांडुरंग सूर्यवंशी, राधिका सूर्यवंशी हे मानाची पदे भूषवत आहेत. राजकीय क्षेत्रातील चंद्रकांत खैरे तसेच आमदार हरीश पिंपळे आणि अनेक नगरसेवकांची नावे समजली.

मंडई परिसरातील बाजारपेठेचा संक्षिप्त आढावा घेताना येथील वस्ती ही महात्मा फुले मंडईच्या स्थापनेबरोबर विकसित झाल्याची माहिती मिळाली. त्या काळी नाममात्र एक आणा भाडे या घरांना होते. शारदा-गजाननावर या सर्व मंडळींची नितांत श्रद्धा असून, मूर्ती उचलून रथावर वा मंडपात आणण्याचा मान या समाजाकडेच आहे. नव्या घरांसाठी मार्केट यार्ड परिसरातील नियोजित जागा शासन दरबारी प्रलंबित असल्याचे समजले. या व्यवसायाची पर्यावरणपूरक उपयुक्तता, समाजबांधवांचे स्वउत्कर्षांचे प्रयत्न, शिक्षणप्रेम, सोशिकता आणि नावीन्याचा ध्यास लक्षात घेता, इतर प्रगत समाज आणि शासनाचा या समाजाच्या विकासाला उचित हातभार लाभावा असे वाटते. चंद्रपूरप्रमाणेच मान्यताप्राप्त व्यवसाय प्रशिक्षण केंद्र पुण्यामध्ये उभारण्याचे या समाजाचे स्वप्न आहे.