‘व्यवसाय प्रतिनिधी’ अशी दुकानदारांची नवी ओळख

स्वस्त धान्य दुकानांमध्ये साखर, गहू, तांदूळ अशा धान्याच्या वितरणाबरोबरच ई-पॉस यंत्रांद्वारे वीजबिल, मोबाइल बिल भरण्यासह इतरही कामे आता करता येणार आहेत. या निमित्ताने स्वस्त धान्य दुकानांना रेशन दुकान सेवा केंद्र म्हणून नवी ओळख मिळणार आहे. याबरोबरच या दुकानांमधील दुकानदार व्यवसाय प्रतिनिधी (बिझनेस करस्पाँडंट) म्हणून काम करणार आहेत. जिल्ह्य़ातील दोन तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर याचे काम सुरू झाले असून लवकरच त्याची व्याप्ती शहरासह जिल्ह्य़ात सर्वत्र केली जाणार आहे.

स्वस्त धान्य वितरण केंद्रांमध्ये साखर, गहू, तांदूळ आणि रॉकेलसह गॅस सिलिंडर देखील मिळणार आहे. याबरोबरच या केंद्रांची व्याप्ती वाढविण्यासाठी ई-पॉस यंत्रावरून वीजबिल, टेलिफोन, मोबाइल बिल भरण्यासह अन्य ई-पेमेंट करण्यास राज्य शासनाकडे परवानगी मागण्यात आली होती. याबाबतचे सादरीकरण झाल्यानंतर राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. स्वस्त धान्य दुकानात बँकांचे व्यवहार करण्याकरिता तांत्रिक साहाय्य येस बँकेकडून घेतले जाणार आहे. येस बँकेकडून साहाय्य घेण्यात येत असले, तरी सर्व बँकांचे तीन हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून करता येणार आहेत.

दुकान व्यावसायिकांना एका खासगी बँकेकडून व्यवहारांच्या तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक व्यवहारानंतर केंद्र चालकाला सेवा शुल्क मिळणार आहे. त्यामुळे केंद्रचालकांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळू शकेल. स्वस्त धान्य वितरण केंद्र हे बँकिंग सेवा केंद्र बनावे, हा या मागचा उद्देश आहे.

१ ऑक्टोबरपासून आधारशिवाय धान्य नाही

स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य घेणाऱ्या नागरिकांना आधार बंधनकारक करण्यात आले असून आतापर्यंत जिल्ह्य़ात ३९ टक्के आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे. १ ऑक्टोबरपासून आधार नसणाऱ्या नागरिकांना धान्य मिळणार नाही. पूर्ण क्षमतेने धान्य वितरित झाल्यानंतरही उरलेले धान्य गरजूंना विकत देण्यात येणार आहे. याबरोबरच शहर आणि जिल्ह्य़ात एक हजार ६४६ ई-पॉस यंत्रे स्वस्त धान्य दुकानांमध्ये बसविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. आतापर्यंत या सर्व दुकानांमध्ये यंत्रे बसविण्यात आली असून यंत्रावरून व्यवहारही सुरू करण्यात आले आहेत. शिरूर, दौंड, भोर, आंबेगाव, पुरंदर, मावळ, हवेली, मुळशी, जुन्नर, इंदापूर, खेड, वेल्हे आणि बारामती अशा तेरा तालुक्यांमध्ये आणि पुणे शहरात मिळून ई-पॉस यंत्रावरून गहू, साखर, तांदूळ वितरण करण्यात येत असून आतापर्यंत ४ लाख ३२ हजार व्यवहार झाल्याची नोंद झाली आहे.

यशस्वी चाचणी

दौंड, हवेली येथील दोन केंद्रांवर प्रायोगिक तत्त्वावर या उपक्रमाची यशस्वी चाचणी झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये मागणीनुसार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांना ई पेमेंटची सुविधा मिळणार आहे. सद्य:स्थितीत नोडल बँक म्हणून येस बँक काम करणार आहे, अशी माहिती जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी दिलीप भालदार यांनी दिली.