बारामती म्हणजे बागायती. हे अर्धसत्य असून, याच तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावांना भरवशाचे पाणीसुद्धा नाही. इतकेच नव्हे, तर शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा, १९७८ साली तिथल्या दुष्काळी २२ गावांना पाण्याचे आश्वासन मिळाले, पण लोक याच आश्वासनावर झुलत राहिले अन् गावे मात्र कोरडीच! ही गावे तहानलेली राहण्यामागे भौगोलिक कारणांबरोबरच राजकीय कारणेसुद्धा आहेत.. कारण ही गावे अगदी अलीकडेपर्यंत बारामती विभानसभा मतदारसंघात समाविष्ट नव्हती.
निवडणुकीच्या तोंडावर बारामती तालुक्यात पाण्याचा मुद्दा उपस्थित झाला. मतदानाच्या आदल्या दिवशी मासाळवाडी गावातील बैठकीत एका तरुणाने उपमुख्यमंत्र्यांना पाण्यावरून प्रश्न विचारला. उपमुख्यमंत्र्यांची जीभ घसरली अन् प्रश्न विचारणाऱ्या तरुणावर दबावापोटी ‘असे काही घडलेच नाही’ असा लेखी खुलासा करण्याची वेळ आली. हे नेमके कसे घडले याची चर्चा परिसरातील गावांमध्ये दबक्या आवाजात सुरूच आहे; त्याचबरोबर पाण्याची प्रतीक्षासुद्धा!
या गावांमध्ये फिरताना बारामतीचे दुसरे चित्र दिसले, अगदी अंगावर आले. बागायती बारामती आणि ही कोरडी बारामती यांतील फरक स्पष्ट दिसतो- उत्पन्न, शिक्षण आणि सामाजिक स्थिती या सर्वच बाबतीत! तो लोकांनाही जाणवू लागला आहे. इतके दिवस आशेवर असलेले लोक आता बोलू लागले आहे, अर्थातच नाव उघड न करण्याच्या अटीवर. ‘निम्मी बारामती अशीच आहे बघा.’ लोक भरभरून सांगतात. बारामतीत शंभराच्या आसपास गावे. त्यापैकी खुद्द बारामती, माळेगाव, सोमेश्वर, निंबूत परिसरातील अशी सुमारे निम्मी गावे ब्रिटिश काळापासून बागायती आहेत. उरलेली कऱ्हा नदीच्या खोऱ्यातील गावे जिरायती. त्यातही दोन प्रकार पडतात- काही गावांना काही महिन्यांसाठी कसेबसे पाणी मिळते. उरलेली २२ गावे पूर्णपणे पाण्याविना आहेत. शेतीसाठी पावसावर आणि विहिरीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी आजही टँकरचीच वाट पाहावी लागते.. मोरगाव, मुर्टी, कऱ्हा वागज, लोणी भापकर, जळगाव या पट्टय़ातील ही गावे.
‘‘पवार साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हा गावात सभा झाली होती. तेव्हा आम्हाला गुंजवणी धरणाचं पाणी देणार, असं बोलले होते. त्याला आता ३५ र्वष उलटून गेली, पण पाणी आलंच नाही..’’ मुर्टी गावात चहाच्या टपरीवर जमलेले लोक सांगतात. रस्त्याच्या कडेला जागोजागी टँकरच्या पाण्यासाठी उभे केलेले ड्रम, कॅन परिस्थितीचे वर्णन करतात. इथं पाणी न येण्याची भौगेलिक कारणे आहेतच. एक तर कमी पावसाचा प्रदेश. त्यात हा उंचावरचा पठारी भाग. पण यामागे राजकीय कारणेसुद्धा असल्याचेही ऐकायला मिळाले. ‘‘ही गावे पूर्वी विधानसभेच्या दौंड मतदारसंघाला जोडली होती. त्यामुळे ती कशीही राहिली, तरी बारामतीच्या राजकारणावर थेट परिणाम व्हायचा नाही. लोकसभेलाही त्यांचे उपद्रवमूल्य नव्हतेच. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यामुळे गेल्या निवडणुकीत ती पहिल्यांदा बारामती विधानसभा मतदारसंघात आली. म्हणून आमच्याकडं लक्ष गेलं.’’ लोक स्पष्टपणे सांगतात. काही जण संतापही व्यक्त करतात. ‘‘इथं पाणी आलं तर लोक जमिनी कशा विकतील? मग यांचे कारखाने कसे उभे राहतील?’’ गंभीर आरोपही करतात. याशिवाय इतरही कारणं बोलून दाखवतात. याच पट्टय़ात मोरगाव परिसरात एक जण भेटले. ‘‘लोकांमध्ये समृद्धी आली तर ते जुमानत नाही, स्पर्धक तयार होतात. त्यामुळे आमचा भाग असा ठेवलाय..’’ इथे असे बरेच काही ऐकायला मिळते.
हा भाग कोरडा राहिल्यामुळे शैक्षणिक, सामाजिकदृष्टय़ासुद्धा मागास राहिला आहे. शिकायची कितीही इच्छा असली, तरी उच्चशिक्षणासाठी पैसे लागतात. इथंच गाडं अडतं. ना शिक्षण, ना नोकऱ्या. ‘‘बाकी कशाला? आमच्या भागात कोणी मुली द्यायला तयार होत नाही. रोज पाण्याची ओरड, रखरखीत भाग. कसं कोण मुली देईल?’’ जळगावचे एक शेतकरी सवाल करतात.. मग हा बारामती तालुक्याचाच भाग आहे का, असा प्रश्न पडतो.