रेल्वेतील वाढती गुन्हेगारी कमी करून प्रवाशांना अधिकाधिक सुरक्षित प्रवासाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी एकीकडे प्रयत्न केले जात असताना रेल्वे व प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असणाऱ्या यंत्रणांतील काही मंडळी मात्र दुसऱ्याच ‘उद्योगा’त गुंतल्याचे आढळून येत आहे. रेल्वे सुरक्षा दल व लोहमार्ग पोलिसातील बहुतांश मंडळी योग्य कर्तव्य बजावत असताना दुसरीकडे मात्र त्यातील काही जण प्रवाशांकडून पैसे लुबाडण्याचे ‘कर्तव्य’ बजावत आहेत. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रवासात किंवा स्थानकाच्या आवारात तरुणांकडील मोबाइल तपासणीची खासगी मोहीम राबविली जात असून, त्यात एखादी पॉर्न चित्रफीत किंवा छायाचित्र आढळल्यास कारवाईची धमकी देत मोठी रक्कम उकळली जात असल्याचे प्रकार होत आहेत.
रेल्वेत सुरक्षा यंत्रणेतील मंडळीकडून प्रवाशांना कारवाईच्या नावाने भीती दाखवून व धमकावून पैशांची लूट करण्याचे प्रकार अनेकदा घडत असतात. प्रवाशाची लुबाडणूक करण्याच्या एका प्रकारात मागील महिन्यामध्ये लोहमार्ग पोलीस दलातील कर्मचाऱ्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बंगळुरुतील एक उद्योजक मुंबई-अजमेर गाडीने प्रवास करत असताना लोणावळ्याजवळ लोहमार्ग पोलिसांना ते पानमसाला खाताना दिसते. त्याबाबत गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून एक लाख रुपयांची मागणी करीत सोळा हजार उकळण्यात आले. या उद्योजकाने याबाबत तक्रार केल्यानंतर तपास करून हा गुन्हा दाखल झाला.
रेल्वे सुरक्षेशी काहीही संबंध नसलेल्या विविध गोष्टींबाबत तपासणी करण्यात अनेक जण गुंतले आहेत. त्यातीलच एक प्रकार म्हणजे मोबाइल संचाची तपासणी. सुरक्षा यंत्रणेतील दोन-तीन मंडळींकडून एकत्रितपणे ही तपासणी केली जाते. अंगावरील कपडय़ांवरून चांगल्या घरातील दिसणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांची किंवा बाहेरगावहून आलेल्या तरुणाची त्यासाठी प्रामुख्याने निवड केली जाते. तपासणी सुरू असल्याचे कारण सांगून तरुणाकडून मोबाइल घेतला जातो. मोबाइलमधील सर्व फोल्डर, चित्रफिती, छायाचित्र व व्हॉट्स अॅपवरील संदेश तपासले जातात. त्यात एखादी पॉर्न चित्रफीत किंवा छायाचित्र आढळल्यास मोबाइल जप्त केला जातो.
मोबाइलमध्ये पॉर्न चित्रफीत सापडल्यामुळे तुझ्यावर कारवाई होणार व गुन्हा दाखल करावा लागणार, अशा प्रकारे धमकी दिली जाते. कारवाई टाळण्यासाठी कधी-कधी पन्नास हजारांपर्यंतची रक्कम मागितली जाते. घाबरलेल्या तरुणांकडून माफी मागितली जाते, पण कारवाई नको असल्यास पैसे द्यावेच लागतील, असा दमच भरला जातो. त्यामुळे संबंधित तरुणाकडे असतील तितके पैसे काढून घेतले जातात व त्यानंतरच मोबाइल त्याचा ताब्यात दिला जातो. अनेकदा मोबाइलमधील मेमरी कार्ड काढून घेतले जाते. प्रवासामध्ये किंवा स्थानकाच्या आवारात अनेक जण या प्रकाराला बळी पडले आहेत. मात्र, अनेकदा या प्रकाराबाबत भीतीपोटी रेल्वे प्रशासन किंवा वरिष्ठांकडे तक्रार केली जात नसल्याने लुबाडणूक करणाऱ्यांचे फावत असल्याचे दिसून येत आहे.