‘हिपेटायटिस- सी’ (पांढरी कावीळ) या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतरही बहुतांश रुग्णांमध्ये अनेक वर्षे कोणतीही लक्षणे दिसत नसल्यामुळे संसर्गाचे निदानच होत नाही. कालांतराने ‘हिपेटायटिस- सी’मुळे यकृताच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकत असून या आजाराविषयी समाजात जनजागृती नगण्य आहे,’ असे मत रुबी हॉल रुग्णालयातील उदरविकारतज्ज्ञ डॉ. नितीन पै यांनी व्यक्त केले.
२८ जुलै हा दिवस ‘वर्ल्ड हिपेटायटिस डे’ मानला जातो. या निमित्ताने डॉ. पै यांनी पत्रकार परिषदेत या आजाराविषयी माहिती दिली. हिपेटायटिस- सी झालेल्या व्यक्तीच्या संसर्गित सुया वापरल्यामुळे, असुरक्षित रक्त संक्रमण वा असुरक्षित लैंगिक संबंधांमधून, संसर्ग झालेल्या व्यक्तीचा रेझर, टूथब्रश, नेल ट्रिमर अशा वस्तू वापरल्यामुळे, हिपेटायटिस- सीचा संसर्ग झालेल्या मातेकडून प्रसूतीच्या वेळी बाळाला अशा कारणांनी या आजाराचे संक्रमण होऊ शकते, अशी माहिती या वेळी देण्यात आली. ‘या आजारावर लस नाही, परंतु बहुतांश रुग्णांमध्ये तो औषधांच्या साहाय्याने बरा होऊ शकतो. प्रारंभिक अवस्थेत या आजारात सहसा लक्षणे दिसत नसल्यामुळे त्याच्या चाचणीबद्दल जागरुकता वाढण्याची आवश्यकता आहे,’ असेही डॉ. पै यांनी सांगितले.