केंद्रात आणि राज्यात सत्ता स्थापन केलेल्या भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादीच्या ताब्यातील ‘श्रीमंत’ पिंपरी महापालिकाजिंकायची आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत चाललेले ‘मोदी कार्ड’ स्थानिक निवडणुकीतही तारून नेईल, असा ठाम विश्वास भाजपच्या स्थानिक नेत्यांना आहे. राष्ट्रवादीला पडत असलेले खिंडार आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या सततच्या ‘इन कमिंग’मुळे भाजपसाठी पिंपरीत चांगले वातावरण आहे. मात्र, पक्षातील ‘गृहकलह’ ही मोठी डोकेदुखी आहे. अंतर्गत वादाची येथील भाजपची परंपरा जुनी असली तरी सध्याचे वाद टोकाला गेले आहेत. त्यामुळे ‘दैव देते अन् कर्म नेते’ अशी वेळ येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ‘बलाढय़’ राष्ट्रवादीशी पर्यायाने अजित पवारांशी भाजपला लढायचे आहे. त्यांना शिवसेनेशी युतीही नको आहे. कोणीच कोणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष घालावे लागेल. अन्यथा, येथील परिस्थिती सुधारू शकणार नाही.

शहर कार्यकारिणीवरून वाद, सरचिटणीस नियुक्तीवरून वाद, संघटन सरचिटणीसपदावरून वाद, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष आणि युवक अध्यक्षपदावरून वाद, नव्या-जुन्यांचा वाद अशा अनेक मुद्यांवरून पिंपरी भाजपमध्ये वादांची मालिकाच सुरू आहे. मध्यंतरी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्यासमोरच ‘प्रोटोकॉल’वरून जोरदार खडाजंगी झाली. आकुर्डीत मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण शिबिरावरून पक्षात बराच गोंधळ झाला. प्रकरण आमदार महेश लांडगे मुर्दाबादच्या घोषणा देण्यापर्यंत गेले. महापालिका सभेतील ‘पेड न्यूज’च्या वादानंतर भाजपच्या पत्रकार परिषदेतून खासदार अमर साबळे व आमदार लांडगे मधूनच निघून गेले. ही काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत आणि पक्षातील वातावरण गढूळ आहे, हे सांगण्यासाठी ती पुरेशी आहेत. अंतर्गत कलह हे या मागचे कारण आहे. मात्र, त्यावर विचार करण्यासाठी पक्षातील कोणालाही वेळ नाही. कोणीच कोणाला जुमानत नसल्याने आणि जो तो आपलेच म्हणणे खरे करू पाहात आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची ही स्थिती आहे. लक्ष्मण जगताप, अमर साबळे आणि महेश लांडगे हे त्रिकूट शहर भाजपच्या नेतृत्वाचा चेहरा आहे. मात्र, तिघांची तोंडे तीन दिशेला आहेत. शहराध्यक्ष जगताप यांची कार्यपद्धती खासदारांना मानवत नाही. जगताप विश्वासात घेत नाहीत, किंमत देत नाहीत, मनमानी करतात ही खासदारांची तक्रार आहे, तर खासदारांचे काम शहराध्यक्षांना रुचत नाही. नव्याने भाजपमध्ये आलेल्या महेश लांडगे यांचे संस्थान वेगळेच आहे. भोसरीपट्टय़ात त्यांचा वेगळाच कारभार सुरू आहे.

तसे पाहिले तर अंतर्गत कलह पिंपरी भाजपला बिलकूल नवीन नाही. त्याला अनेक वर्षांची परंपरा आहे. वसंत वाणी-चेतनदास मेवाणी, भीमराव जवळकर-तुकाराम जवळकर, डॉ. प्रतिभा लोखंडे-मामनचंद आगरवाल, वाणी-आगरवाल, पै. ज्ञानेश्वर शेडगे-वाणी, दादा ढवाण-आगरवाल, अंकुश लांडगे-महेश कुलकर्णी-सुरेश गादिया असे अनेक वाद येथील भाजप कार्यकर्त्यांनी पाहिले आहेत, अनुभवले आहेत. अंकुश लांडगे यांनी विलास लांडे यांच्या दावणीला भाजप बांधल्याचा आरोपही झाला होता. लांडगे यांच्यानंतर शहराध्यक्ष झालेल्या भगवान मनसुख यांचेही अनेकांशी खडके उडाले होते. एकनाथ पवार यांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी मिळाली, तेव्हाही वाद झाला होता. नगरसेवक असतानाच पवार यांना शहराध्यक्षपद दिले, त्यावरून बरेच रान पेटले होते. त्याच कालावधीत मुंडे-गडकरी वादाने जोर पकडला. गटबाजीच्या पेटलेल्या वातावरणातच महापालिका निवडणुका झाल्या, तेव्हा अवघ्या तीन जागा मिळाल्याने भाजपची पुरती बेअब्रू झाली, पवार टीकेचे धनी झाले.

त्यानंतर खांदेपालट झाले, तेव्हा अनेक दिग्गज रांगेत असतानाही गोपीनाथ मुंडे यांनी निष्ठा व समाजप्रेम म्हणून सदाशिव खाडे यांची शहराध्यक्षपदी वर्णी लावली. त्यांनी त्यांच्या पद्धतीने पक्षाचा गाडा हाकला. त्यांच्याच काळात लोकसभा-विधानसभा निवडणुका झाल्या. लक्ष्मण जगताप भाजपमध्ये आले. महापालिका निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून अजित पवारांशी पंगा घेऊ शकेल, या भावनेतून जगतापांच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ घालण्यात आली. जगताप भाजपला सत्ता मिळवून देतील, असे स्वप्नही भाजप कार्यकर्ते पाहू लागले. मात्र, तो आनंद फार काळ टिकला नाही. जगतापांनी भाजपची राष्ट्रवादी करून टाकली. जो खेळ ते राष्ट्रवादीत करत होते, त्याचाच कित्ता ते भाजपमध्ये गिरवू लागले. त्यामुळे शहराध्यक्षांच्या कार्यपद्धतीविषयी पक्षात नाराजीचा सूर आहे. ते सांगण्याचे धाडस कोणी करत नाही. अनेकांचा विरोध असतानाही जगताप यांनी सारंग कामतेकर यांचा भाजप प्रवेश घडवून आणला, त्यांना सरचिटणीस व नेतेपदही दिले. ‘लॅपटॉप बाबा’ म्हणून पक्षात प्रसिद्ध असलेले कामतेकर यांच्याकडे सध्या लक्ष्मण जगताप यांचा पूर्ण ताबा आहे. जगताप त्यांच्या आहारी गेले असल्याचे भाजप वर्तुळातच उघडपणे बोलले जाते. नगरसेविका सीमा सावळे यांच्या संभाव्य आमदारकीसाठी कामतेकर यांच्याकडून होणाऱ्या सादरीकरणास पक्षात मोठय़ा प्रमाणात विरोध आहे. मात्र, जगतापांचा सावळे-कामतेकरांना पूर्ण पाठिंबा आहे. माजी खासदार गजानन बाबर यांच्याबाबतीत कामतेकरांचा जो पूर्वानुभव सांगितला जातो, त्यापुढचा ‘अध्याय’ म्हणून जगतापांकडे पाहिले जाते. जगतापांच्या विरोधात पक्षात वाढता असंतोष आहे. त्यांच्यासोबत असणाऱ्या ठराविक चेहऱ्यांमुळे पक्षात बरेच जण अस्वस्थ आहेत. जगतापांनी मात्र झोपेचे सोंग घेतले आहे. खासदार साबळे यांच्याबद्दलही पक्षात नाराजी व्यक्त होते. महेश लांडगे यांना मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांचे पाठबळ असल्याने त्यांना इतरांशी काही घेणे-देणे दिसत नाही, असेही पक्षात ऐकायला मिळते. कधीही निवडणुका जाहीर होतील, अशी चिन्हे असताना पक्षात मात्र तीव्र धुसफूस आहे. सत्ता आणायची तर अजित पवारांशी लढावे लागेल. त्यांचा पराजय करण्याची ताकद सध्यातरी भाजपमध्ये नाही. शिवसेनेशी युती करण्याविषयी भाजपमध्ये फारसे कोणी सकारात्मक नाही. त्यामुळे सत्तेचे गणित कसे जुळणार, याविषयी साशंकता आहे. मुख्यमंत्र्यांना पिंपरीत सत्ताबदल हवा असल्यास आणि अजित पवार यांना बारामतीचा रस्ता दाखवायचा असल्यास मुख्यमंत्र्यांनाच वैयक्तिक लक्ष घालावे लागेल.