दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या मुद्दय़ावरून पालिकेच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ‘आमने-सामने’ आले आहेत. भाजपने शिवसेनेला विश्वासात घेतले नसून ठाकरे परिवारातील सदस्यास निमंत्रित करण्याची मागणीही अमान्य केली आहे. भाजप श्रेयासाठी घृणास्पद राजकारण करत असल्याचा आरोप करत शिवसेनेने भाजपचा निषेध केला आहे. तर, भाजपने मौन धारण केले आहे.

पालिका सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांची तैलचित्रे लावण्यात आली आहेत, त्याचे अनावरण रविवारी (२८ मे) सकाळी अकरा वाजता राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महापौर नितीन काळजे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, कार्यक्रम दोन दिवसांवर आला असताना तैलचित्राच्या मुद्दय़ावरून भाजप-शिवसेना आमने-सामने आले आहेत. यासंदर्भात, शिवसेनेचे शहरप्रमुख व गटनेते राहुल कलाटे यांनी भाजपच्या राजकारणाचा निषेध करणारे एक पत्रच आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहे. तैलचित्राचा विषय सुरू झाला, तेव्हापासून या कार्यक्रमासाठी ठाकरे परिवारातील सदस्य व शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना आमंत्रित करण्याची मागणी आम्ही करत आहोत. मात्र, भाजपने आम्हाला विश्वासात घेतले नाही. तैलचित्र लावण्याचे श्रेय स्वत:कडे घेण्याचा भाजपचा प्रयत्न हा घृणास्पद प्रकार आहे. या कार्यक्रमात फेरबदल करावेत आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना आमंत्रित करावे, अशी मागणी शहरप्रमुखांनी आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात भाजप नेते जाहीर भाष्य करत नाहीत. मात्र, आमची ‘अडचण’ लक्षात घ्या, अशी सूचक टिप्पणी करत आहेत.

..ही तर ‘प्रिंटिंग मिस्टेक’

तैलचित्र अनावरण कार्यक्रमाच्या प्रत्रिकेत बऱ्याच चुका झाल्या आहेत. कार्यक्रमाची वेळ सकाळी एक वाजता आहे, असा उल्लेख आहे. राजापुरे असे आडनाव असताना राज्यापुरे केले आहे. याशिवाय, अनेक शब्द चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध झाले आहेत. पत्रकारांनी ही बाब लक्षात आणून दिली. तेव्हा पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तेव्हा ही तर ‘प्रिंटिंग मिस्टेक’ असल्याचे साचेबद्ध उत्तर देत अधिकाऱ्यांना सारवासारव करावी लागली.

शहरप्रमुख राहुल कलाटे यांचे पत्र उशिरा मिळाले. त्यामुळे शिवसेना नेत्यांना बोलवता आले नाही. यामध्ये कोणत्याही प्रकारचे श्रेयवादाचे राजकारण नाही.

– नितीन काळजे, महापौर, पिंपरी-चिंचवड