काँग्रेस सोडण्याचा आपला विचार नाही. चुकीची माहिती देऊन आपल्यासह समर्थक नगरसेवकांविषयी प्रदेशाध्यक्षांचे मत कलुषित करण्यात आले होते. मात्र, आम्ही आमची बाजू मांडल्यानंतर त्यांचे गैरसमज दूर झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष देतील तो निर्णय आम्ही मान्य करू, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केली आहे.
पिंपरीतील गटबाजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे. निरीक्षक पाठवून त्यांनी दोन्ही गटांचे म्हणणे समजावून घेतले, त्यांनी स्वत:ही दोन्ही गटांशी संवाद साधला. कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर यासंदर्भातील अंतिम निर्णय होणार आहे. यासंदर्भात, भोईर म्हणाले,‘काँग्रेसमधून आपल्याला का निलंबित केले, याची कल्पना नाही. आम्हा नगरसेवकांविषयी चुकीची माहिती पक्षश्रेष्ठींना दिली जात आहे. प्रदेशाध्यक्षांना आम्ही सर्व मुद्दे व तांत्रिक गोष्टींची सविस्तर माहिती दिल्यानंतर त्यांना सर्वकाही लक्षात आले. राष्ट्रवादीशी कसलेही संधान बांधलेले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीची राज्यात अनेक ठिकाणी आघाडी आहे. पुण्यात राष्ट्रवादीचा महापौर तर काँग्रेसचा उपमहापौर आहे. िपपरीत अशी आघाडी होत असल्यास गैर काय आहे?  पिंपरीतील आघाडी केवळ काँग्रेसच्या १४ नगरसेवकांची नसून अपक्षांसह २२ जणांची आहे. आघाडीचा निर्णय या सर्वावर बंधनकारक आहे. विभागीय आयुक्तांकडे तशी नोंद करण्यात आली आहे. एक महिना ‘जैसे थे’ परिस्थिती राहणार असून त्यानंतर सर्व गोष्टींची स्पष्टता होणार आहे.’