रविवारी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर पुरस्कार प्रदान
शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ भावगीतगायक अरुण दाते यांना यंदाचा राम कदम कलागौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
बालगंधर्व रंगमंदिर येथे रविवारी (३ जुलै) सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते अरुण दाते यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महापौर प्रशांत जगताप, प्रसिद्ध पाश्र्वगायक सुरेश वाडकर, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे आणि दुबई येथील ‘वुई िलक ग्रुप’चे अध्यक्ष अमेर सालेम, नितीन दरोडे, श्यामला गायकवाड आणि राम कदम यांचे पुत्र विजय कदम या वेळी उपस्थित राहणार आहेत. अमरावती येथील शेखर पाटील यांना पवार यांच्या हस्ते आदर्श कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार प्रदान कार्यक्रमानंतर तनुजा जोग, जितेंद्र अभ्यंकर आणि सुवर्णा माटेगावकर हे कलाकार अरुण दाते यांची लोकप्रिय भावगीते सादर करणार असून काही गीतांवर नृत्याविष्कार होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक लक्ष्मीकांत खाबिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.