जुन्नर परिसरात मानवी वस्तीत बिबटय़ाच्या वावराचा प्रश्न असला, तरी भीमाशंकरच्या गर्द जंगलात प्राणिगणना करताना मात्र बिबटय़ाचे दर्शन घडणे कौतुकाचे आणि तितकेच थरारून टाकणारे असते. गेल्या वर्षी प्राणिप्रेमींना हूल दिलेल्या बिबटय़ाने यंदाच्या गणनेत मात्र त्यांना निराश केले नाही. प्रतिवर्षी बुद्धपौर्णिमेला केल्या जाणाऱ्या प्राणिगणनेत या वेळी भीमाशंकरमध्ये पाच ठिकाणी बिबटय़ाचे अस्तित्व जाणवले, तर एका बिबटय़ाने प्रत्यक्ष दर्शनही दिले.
भीमाशंकर, सुपे, नान्नज, करमाळा आणि रेहेकुरी येथील प्राणिगणनेच्या अहवालातील एकंदरीत चित्र आशादायक दिसत असून विशेषत: गवत खाणारे प्राणी अधिक संख्येने दिसले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा अधिक चिंकारा आणि काळविटांचे दर्शन घडले आहे. सुप्यातील मयूरेश्वर अभयारण्यात या वेळी २७४ चिंकारा दिसले. गेल्या वर्षी याच भागात २५७ चिंकारांची नोंद झाली होती. नान्नज, करमाळा आणि रेहेकुरीमध्ये काळविटेही या वेळी मोठय़ा संख्येने दिसली आहेत. २०१५ मध्ये या तीन ठिकाणी १,०६३ काळविटे दिसली होती. या वेळी मात्र काळविटांची संख्या १,१३४ आहे. यात नान्नजमध्ये तुलनेने कमी काळविटांचे दर्शन झाले असले तरी करमाळ्यात काळविटे बरीच अधिक संख्येने दिसली आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी चौशिंगा हरीण अजिबात दृष्टीस पडले नव्हते. या वेळी भीमाशंकरमध्ये एक चौशिंगा दिसला. भीमाशंकरमध्ये १५ सांबर दिसली असून भेकरांची संख्याही गतवर्षीच्या तुलनेत मोठी आहे. भीमाशंकरमध्येच गेल्या वर्षी २४ भेकर दिसली होती. ती यंदा ४१ दिसली, तसेच ४ पिसोरी हरणेही (माउस डिअर) बघायला मिळाली.
विभागीय वन अधिकारी शिवाजी फटांगरे म्हणाले, ‘‘वनाखाली असलेल्या भागाच्या बाहेर पाण्याची टंचाई असल्यामुळे वनातील कृत्रिम पाणवठय़ावर प्राण्यांची संख्या वाढल्याचे आढळले. नान्नजमध्ये काळवीट जास्त दिसले. या भागात गवती कुरणांमध्ये लावली गेलेली ग्लिरिसिडिया वनस्पती गेल्या दोन वर्षांत काढण्यात आली आहे. त्यामुळे गवताळ प्रदेशाची गुणवत्ता वाढली व काळविटांचे खाद्य वाढले.’’ याशिवाय आणखी काही लक्षणीय गोष्टी या वर्षीच्या गणनेत आढळल्या. गतवर्षी लाल तोंडाची १४१ माकडे दिसली होती. या वर्षी मात्र एकही माकड दिसले नाही. उलट काळतोंडय़ा वानरांची संख्या मात्र यंदा मोठी (२७२) दिसून आली. गतवर्षी साळिंदर (सायाळ) देखील अजिबात दिसले नव्हते. ती यंदा १४७ दिसली. रानडुकरेही गतवर्षीच्या तुलनेत मोठय़ा संख्येने (२३८) आढळली.

लांडगे, कोल्हे, माळढोक कमी आढळले!
लांडगा, कोल्हा आणि खोकड मात्र यंदा कमी संख्येने दिसले आहेत. नान्नज, करमाळा, रेहेकुरी आणि सुप्यात गतवर्षी ४४ लांडग्यांचे दर्शन झाले होते. ते या वर्षी तेहेतीसच दिसले. कोल्हेही केवळ ५ दिसले. ते गेल्या वेळी १५ आढळले होते. गणनेत दृष्टीस पडलेल्या खोकडांची संख्याही ३१ वरून १७ वर आली. तसेच गेल्या वर्षी दिसलेल्या तीन माळढोक पक्ष्यांपैकी यंदा दोनच आढळले.