शनी शिंगणापूर येथील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश द्यावा, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना निनावी पत्र पाठवून धमकी देण्यात आली आहे. देसाई यांना धमकी देण्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. तुमचाही दाभोलकर होईल, असे या धमकीपत्रात म्हटले आहे.
शनी शिंगणापूर येथील शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश द्यावा, अशी मागणी करून भूमाता ब्रिगेडने सुरु केलेल्या आंदोलनामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या आंदोलनाची चर्चा सुरू असतानाच देसाई यांना धमकीचे पत्र आले आहे. तुम्ही सुरू केलेल्या आंदोलनामुळे सामान्यांना त्रास होत आहे. तुम्ही जर सरकारविरुद्ध लढत असाल तर खुशाल लढा. परंतु स्त्री समानतेसाठी तुम्ही शिंगणापूरचे आंदोलन का सुरु केले, अशी विचारणा या पत्रातून करण्यात आली आहे. तुम्हाला शेतकरी दिसत नाही का, बसच्या पाससाठी आत्महत्या करणारी विद्यार्थिनी दिसत नाही का, तुम्ही जर रणरागिणी समजत असाल तर स्त्री शिक्षण आणि स्त्रीभ्रूण हत्या या प्रश्नी लढा का उभारत नाही? स्त्रिया जास्तीत जास्त सुरक्षित कशा होतील, याचा विचार करावा. नाहीतर तुमचाही दाभोलकर होईल, अशी धमकी तृप्ती देसाई यांना पाठविलेल्या पत्रातून देण्यात आली आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांच्या विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकांत पाठक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, अद्याप देसाई यांना पाठविलेले धमकीचे पत्र पोलिसांनी पाहिले नाही. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केलेली नाही.
शनी शिंगणापूर येथे देसाई यांच्या संघटनेने आंदोलन सुरू केल्यानंतर ग्रामस्थ आणि भूमाता ब्रिगेड यांच्यात बैठक झाली होती. त्यानंतर आध्यामिक क्षेत्रातील श्री श्री रवीशंकर यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु या चर्चेतून तोडगा निघाला नाही.