पुणे जिल्ह्यातील पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे लोणावळ्यातील भुशी धऱण काठोकाठ भरुन वाहण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून सतत झालेल्या पावसाने धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे. पावसाला सुरुवात झाल्यापासून मोठ्या प्रमाणात पर्यटक लोणावळ्यामध्ये दाखल होताना दिसत आहेत. पावसासोबतच या ठिकाणी धुक्याचे प्रमाण देखील पाहायला मिळते.

पुणे आणि मुंबईचे पर्यटक दरवर्षी लोणावळ्यातील भुशी धरण काठोकाठ भरण्याची वाट पाहत असतात. पावसाने ऐन सुटीच्या दिवशी हजेरी लावल्याने भुशी धरण ओसंडून वाहू लागले. मुंबई-पुणे हा द्रुतगती मार्गावर पावसामुळे वाहतूक संथगतीने सुरू आहे. या पावसाने पर्यटकांना चांगलीच ट्रिट मिळालीे. धरणाच्या सांडव्यावरुन वाहणाऱ्या पाण्याचा पर्यटक मनमुराद आनंद घेताना दिसते.  डोंगरभागात जास्त पाऊस झाल्याने शनिवारी ४० टक्के  भरलेल्या धरणाच्या पाणासाठ्यात तब्बल निम्म्याहून अधिक पाणी साठा वाढला. सोमवारी सकाळपासून धरण काठोकाठ भरुन वाहू लागले आहे.

शनिवार, रविवार आणि ईदची अशी तीन दिवस सलग सुटी असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर भुशी धरणावर फेरफटका मारण्यासाठी येत आहेत. या ठिकाणी दाखल झालेल्या पर्यटकांमध्ये धरणाच्या पायर्‍यांवर बसून पावसात चिंब भिजण्याचा आनंद, तसेच फोटोची क्रेझ देखील पाहायला मिळते. धरणाच्या पाणीपातळीत झालेली वाढ स्थानिक विक्रेत्यांना सुखावणारी आहे.  पावसाचा आनंद घेणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने  स्वतः ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.