स्वतंत्र मार्गिकेवरही वाहनांची घुसखोरी; ‘ट्रॅक’चा वापर पार्किंग, अनधिकृत टपऱ्यांसाठी

पुणे हे सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे आणि ही ओळख जपण्यासाठी तसेच सायकल वापराला चालना देण्यासाठी शहरातील विविध रस्त्यांवर महापालिकेतर्फे सायकल ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. मात्र सायकलींसाठी हक्काच्या असणाऱ्या या मार्गावरून सायकलींपेक्षा अन्य वाहनेच प्रवास करत आहेत.

महापालिकेने सन २००७ साली सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, सोलापूर रस्ता, नगर रस्ता आदी महत्त्वाच्या रस्त्यांवर सायकल ट्रॅक विकसित केले. सायकलस्वारांना सुरक्षित प्रवास करता यावा, सायकल वापराला प्रोत्साहन मिळावे आणि इंधनाची बचत व्हावी, असा त्यामागचा उद्देश होता. नेहरू योजने अंतर्गत मिळालेला निधी खर्च करुन १२६ किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक तयार करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात या मार्गावरुन सायकल घेऊन जाणाऱ्यांना जागोजागी अडथळ्यांचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी रस्ता अरुंद आहे म्हणून सायकल मार्ग बेपत्ता झालेले आहेत, तसेच काही अंतरांनंतर ते पुन्हा सुरू झाले आहेत. काही ठिकाणी रस्ता रुंदीकरण न झाल्याने मार्ग पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे सायकल मार्गाचा वापर करताना सायकलस्वारच दिसत नाहीत. ते रस्त्याच्या कडेने जीव मुठीत धरुन मार्गक्रमण करीत असतात. दोन ते अडीच मीटर रुंद असणाऱ्या ट्रॅकचा वापर पार्किंगसाठी आणि अनधिकृत पथारीवालीवाल्यांसाठी होत आहे.

सायकलट्रॅकचे सध्या चित्र

  • सायकल मार्गाची जागा पार्किंग, राडारोडा, कचरा यांनी घेतली आहे.
  • अरुंद रस्त्यांमुळे सलग ५०० मीटर अंतराचे सायकल मार्गच नाहीत.
  • जास्तीत जास्त लोकांनी सायकलींचा वापर करावा, यासाठी महापालिका प्रशासनाकडून विशेष असे प्रयत्न, प्रोत्साहन नाही.
  • शहरातील सर्वच सायकल मार्गावर बेसुमार अतिक्रमणे. प्रशासनाचे साफ दुर्लक्ष.
  • सायकल मार्गावर बसथांबे, महावितरणचे डीपी बॉक्स आहेत.
  • सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग पेट्रोलपंपाच्या पुढे सायकल ट्रॅकवर खाऊगल्ली झाली आहे. सुरुवातीला एक-दोन असणारे हातगाडीवाले आता तीस-चाळीसच्या घरात गेले आहेत.

प्रवीणसिंह परदेशी आयुक्त असताना त्यांनी सायकलींचे महत्त्व ओळखून दर मंगळवारी ‘विना वाहन दिवस’, सायकलसाठी राखीव पार्किंग असे काही प्रयोग राबविले. त्यांच्यानंतर आलेले अधिकारी आणि राजकीय नेतृत्वाने काहीच प्रयत्न केले नाही. सायकल मार्ग तयार करण्याचा निधी आला, त्याच्या देखभालीसाठी निधीच नाही, असे वॉर्डस्तरीय अधिकारी सांगतात. रस्त्यांसाठी कोटींमध्ये खर्च होत असताना पदपथ व सायकल ट्रॅकसाठी काहीच निधी नाही हा विरोधाभास आहे.

– जुगल राठी, पुणे सायकल प्रतिष्ठान

सायकल मार्गावर झालेल्या अतिक्रमणांबाबत महापालिकेचा अतिक्रमण विभाग व पोलीस यांच्याशी संपर्क चालू आहे. या दोन्ही यंत्रणांच्या साहाय्याने अतिक्रमणे दूर करून सायकल मार्ग वापरात येतील यासाठी प्रयत्न केले जातील.

– राजेंद्र राऊत, पथ विभागप्रमुख