रुग्णांना हकनाक भरुदड

शहरातील ६८ रुग्णालयांनी २१ एप्रिलपासून ‘कॅशलेस’ (विनारक्कम) वैद्यकीय विम्याची सुविधा पुरवणे बंद केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील चार विमा कंपन्यांनी स्थापन केलेल्या ‘जिप्सा’ कंपनीने रुग्णालयांबरोबर कराराचे नूतनीकरण केले नाही, तसेच मोठय़ा रुग्णालयांनी मागितल्याप्रमाणे ६४ प्रकारच्या उपचारांमध्ये दरवाढ दिली नाही, म्हणून या रुग्णालयांनी ‘कॅशलेस’ सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला.

‘जिप्सा’ कंपन्यांच्या एकेकटय़ा (इंडिव्हिज्युअल) तसेच ‘कॉर्पोरेट’ अशा दोन्ही प्रकारच्या ग्राहकांना ‘कॅशलेस’ वैद्यकीय सेवा मिळणार नसल्यामुळे रुग्णांचे हाल होणार आहेत. रुग्णालयात आधी पैसे भरून उपचार घेणे आणि नंतर विम्याचा परतावा मिळवणे हाच पर्याय त्यांच्यासमोर उरणार आहे. मोठय़ा रुग्णालयांच्या संघटनेचे अध्यक्ष बोमी भोट म्हणाले, ‘‘‘जिप्सा’ कंपन्यांबरोबरचा आमचा करार ३१ मार्च रोजी संपुष्टात आला. तत्पूर्वी जानेवारीमध्ये कंपनीस कराराच्या नूतनीकरणाविषयी पत्र पाठवले होते. करार संपल्यानंतर १५ एप्रिलपर्यंत आम्ही थांबलो, परंतु नूतनीकरण झाले नाही. त्यानंतर ‘कॅशलेस’ विम्यास संमती मिळणे बंद झाल्यामुळे आम्ही ही सुविधा बंद केली आहे. संघटनेतर्फे ६४ प्रकारच्या उपचारांसाठी दरवाढीची मागणी करण्यात आली होती, ती देखील मान्य झाली नाही.’’

‘जिप्सा’ कंपनीने देऊ केलेले उपचारांचे दर मान्य नसल्यामुळे पुण्यातील लहान रुग्णालयांनी ‘कॅशलेस’ वैद्यकीय विमा सुविधा १ डिसेंबर २०१४ पासूनच बंद केली आहे. सध्या ही रुग्णालये केवळ ‘कॉर्पोरेट’ ग्राहकांना ही सेवा देतात. सामान्यांनी ‘कॅशलेस’च्या भानगडीत न पडता आधी खर्च करून परतावा घेण्याचा मार्ग स्वीकारावा, असे मत लहान रुग्णालयांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. नितीन भगली यांनी व्यक्त केले. ‘‘कॅशलेस’साठी अधिक ‘प्रीमियम’ भरूनही रुग्णांना घराजवळचे रुग्णालय निवडण्याचा पर्याय मिळत नव्हता. केवळ मोठय़ा रुग्णालयांमध्येच त्यांना जावे लागत होते,’ असे ते म्हणाले.

‘न्यू इंडिया अश्युरन्स’, ‘युनायटेड इंडिया इन्श्युरन्स’, ‘ओरिएंटल इन्श्युरन्स’ आणि ‘नॅशनल इन्श्युरन्स’ या चार विमा कंपन्यांचा ‘जिप्सा’मध्ये समावेश आहे. यातील ‘न्यू इंडिया अश्युरन्स’च्या पुण्यातील प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही.