शतकोत्तर रौप्य महोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पुण्यात आयोजित दुचाकी रॅलीचा आज फज्जा उडाला. जोरदार पावसामुळे नागरिकांनी या दुचाकी रॅलीकडे पाठ फिरवली. या रॅलीत १ हजार दुचाकीचालक सहभागी होतील असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात १२५च्या आसपास दुचाकीचालक यात सहभागी झाले होते. मात्र, यासाठी नाश्त्याची सोयही करण्यात आली होती. उरलेला नाश्ता वाया जाऊ नये म्हणून त्याचे गरीबांना वाटप करण्यात येणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.

शतकोत्तर रोप्य महोत्सवी सार्वजनिक गणेश उत्सवानिमित्त पुणे महानगरपालिकेच्यावतीने आज महापालिकेच्या मुख्य इमारती पासून महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते रॅलीस सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

शतकोत्तर रोप्य महोत्सवी सार्वजनिक गणेश उत्सवाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मागील आठवड्यात शनिवारवाड्यावर मोठ्या उत्साहाच्या वातावरणात करण्यात आले होते. या महोत्सवाअंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे महापालिका प्रशासनामार्फत आयोजन करण्यात आले आहे. मागील आठवड्यात महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषद घेऊन दुचाकी रॅलीबाबत माहिती देण्यात आली होती. यामध्ये रॅलीचा मार्ग देखील सांगण्यात आला होता. त्यात मंडईचा भाग देखील होता. मात्र, पर्यावरण अहवालात याच परिसरात प्रदूषण अधिक प्रमाणात होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तेव्हा हा मुद्दा पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला होता. महापौरांना यावर कोणतीही प्रतिक्रिया देता आली नाही. पत्रकार परिषद आटोपती घेण्यास त्यांना भाग पडले होते.

मात्र, आजच्या रॅलीमध्ये १२५च्या आसपास दुचाकी चालक सहभागी झाले होते. त्यामुळे सव्वाशे वर्षांच्या गणेशोत्सवाच्या प्रचारासाठी सव्वाशे बाईक सहभागी झाल्याची चर्चा होती. दरम्यान, यातून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एका बाजूला पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे अशी मागणी करतात आणि दुसऱ्या बाजूला दुचाकी रॅली का काढली जाते?, असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकामधून उपस्थित केला जात आहे.

रॅलीचे उद्घाटन न करताच पालकमंत्री निघून गेले
दुचाकी रॅलीच्या कार्यक्रमाचे नियोजन महापालिका प्रशासननाने चांगल्या प्रकारे केले होते. मात्र आज झालेल्या जोरदार पावसाचा फटका याला बसलाच. मात्र, या रॅलीस पालकमंत्री गिरीश बापट हे नियोजित वेळेपूर्वी कार्यक्रमस्थळी आले होते. मात्र, ते तब्ब्ल अर्धा थांबून निघून गेले, त्यामुळे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते हस्ते रॅलीचे उदघाटन करावे लागले.

पुणे महापालिकेपासून सकाळी ९ वाजता दुचाकी रॅलीस सुरुवात झाली. ती शनिवारवाडा ते कसबा गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती चौक, मंडई त्यानंतर पुढे शिवाजी रस्त्याने, स्वारगेट ते सारसबाग, अभिनव चौक ते अलका टॉकीज, शास्त्री रोड, सेनादत्त पोलीस चौक, म्हात्रे पुल, कर्वे रोड, डेक्कन, खंडोजी बाबा चौक, गुडलक चौक, एफ सी रोड, झाशीची राणी चौक ते ओंकारेश्वर, वर्तकबाग आणि रमणबाग येथे रॅली संपणार होती. मात्र, तेथील मैदानावर पावसामुळे चिखल झाल्याने केसरी वाडा येथे याची सांगता झाली.

रॅलीत कुठे होते भाजपचे ९८ नगरसेवक
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत पुणेकर नागरिकांनी तब्बल भाजपचे ९८ नगरसेवक निवडून दिले आहे. मात्र, महापालिकेच्यावतीने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवीवर्षाच्या कार्यक्रमाला या ९८ नगरसेवकांपैकी केवळ मोजकेच भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यामुळे कुठे होते भाजपचे ९८ नगरसेवक असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.