राज्यातील पक्षिमित्रांना सिक्कीममधील पक्ष्यांचा अभ्यास करण्याची संधी आता मिळणार आहे. पुण्यातील संस्थांच्या माध्यमातून त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती नेचर वॉक ट्रस्टचे विश्वस्त अनुज खरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचप्रमाणे २८वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन १७ आणि १८ जानेवारीला पुण्यात होणार असल्याची घोषणाही या वेळी करण्यात आली.
महाराष्ट्र पक्षिमित्र आणि नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. तज्ज्ञांची व्याख्याने, त्यांनी पक्षिसंवर्धनासाठी केलेले कार्य यांचे सादरीकरण या संमेलनात करण्यात येणार आहे. आपल्या संशोधनाबाबत सादरीकरण करण्यासाठी २ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. आलेल्या अर्जातील निवडक अर्जाना संमेलनात सादरीकरण करता येणार आहे.
घोले रस्त्यावरील महात्मा फुले वस्तुसंग्रहालय येथे हे संमेलन होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ. संजीव नलावडे या वेळी उपस्थित राहणार आहेत. ‘सिक्कीममधील पक्ष्यांचा अभ्यास करण्याची संधी राज्यातील पक्षी अभ्यासकांना मिळावी यासाठी सिक्कीममधील प्रशासन आणि काही पक्षिसंवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांशी सध्या बोलणे सुरू आहे. त्याचप्रमाणे संमेलनाच्या वेळी सिक्कीमच्या राज्यपालांकडेही याबाबत प्रस्ताव मांडण्यात येणार आहे,’ असे खरे यांनी सांगितले.
संमेलनाचे वेळापत्रक आणि अधिक माहिती www.pakshimitra.org   किंवा   http://www.naturewalktrust.org/pakshimitraया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.