वाढदिवस साजरे करण्याची अधिष्ठात्यांची हौस.. महाविद्यालयांचा नाईलाज यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये शुल्क स्वरूपात दिलेल्या पैशाला पाय फुटू लागले आहेत.  अधिष्ठात्यांचा पंचतारांकित हॉटेलमध्ये साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसासाठी महाविद्यालयांकडून हजारो रुपयांच्या देणग्या वसूल करण्यात आल्या आहेत.
पुणे विद्यापीठाच्या एका महत्त्वाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्याशाखेचे अधिष्ठाता.. हा अभ्यासक्रम चालवण्याच्या बाजारपेठेत पुणे आघाडीवर.. त्यातच या  महाविद्यालयांच्या संघटनेचे नेतेही हेच अधिष्ठाता.. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये त्यांचा दराराही मोठा! एकदा काय झालं.. या अधिष्ठात्यांच्या वाढदिवसाची खबर कानोकान पसरली आणि या अधिष्ठात्यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस जोशात साजरा करण्याचा घाट घातला. आता एवढय़ा महाविद्यालयांचे कळत नकळत पालकत्व सांभाळणाऱ्या या अधिष्ठात्यांचा वाढदिवस साधेपणाने वगैरे कसा करणार.. त्यासाठी पंचतरांकित हॉटेलच पाहिजे.. मग एवढा खर्च पेलायचा कुणी? साहजिकच कार्यकर्त्यांची वापले वळली महाविद्यालयांकडे. महाविद्यालये, खासगी संस्थांचे संचालक, प्राचार्य यांचे फोन खणखणू लागले. महाविद्यालयांचे स्थानिक चौकशी समित्यांचे अहवाल, ‘नेमक्या’ व्यक्तींच्या नेमणुका आणि या महाविद्यालयांच्या संघटनेचे तारणहार असल्यामुळे विद्यार्थी शोधमोहिमेतील त्यांचे सहकार्य.. या आणि अशा कितीतरी गोष्टी विसरण्याचा कृतघ्नपणा महाविद्यालये तरी कशी करणार..? साहजिकच जड आवाजात का होईना पण बहुतेक संचालक किंवा प्राचार्याच्या तोंडून अपेक्षित उत्तर कार्यकर्त्यांना मिळाले.
या अधिष्ठात्यांचा वाढदिवस मोठय़ा झोकात साजरा होणार आहे. त्यासाठी अनेक महाविद्यालयांकडून २०-२५ हजार रुपयांच्या देणग्या वसूल करण्यात आल्या आहेत. काही महाविद्यालयांनी तर स्वेच्छेने लाखाच्या घरात देणग्या दिल्याची चर्चा आहे. महाविद्यालयांच्या हिशोबामध्ये ‘अधिष्ठात्यांचा वाढदिवस’ अशी खर्चाची कोणतीच तरतूद नसल्यामुळे महाविद्यालयांच्या इतर खर्चाच्या तपशिलात हा खर्च कसा खपवून नेता येईल याचा अभ्यास सध्या महाविद्यालयांमध्ये सुरू आहे. महाविद्यालयांनी दिलेल्या देणग्या ह्य़ा कळत न कळतपणे विद्यार्थ्यांच्याच खिशातून दिल्या आहेत. मात्र, अधिष्ठात्यांना यातले काही माहीत नाही. शैक्षणिक गुणवत्ता राखणे, आपल्या विद्याशाखेचे नेतृत्व करणे आणि आपल्या विद्याशाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे हित जपणे, हे खरे अधिष्ठात्यांचे काम आहे.
———