पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा संशय; सहा हल्लेखोर ताब्यात

वडगाव मावळ तालुक्यातील सांगवडे गावात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आला. चार दिवसांपूर्वी गावात झालेल्या वादातून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांकडून रविवारी सायंकाळी सहा हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले.

नवनाथ अर्जुन लिमण (वय ३२, रा. सांगवडे, ता. वडगाव मावळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. नवनाथ हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांची पत्नी दीपाली या सांगवडे गावाच्या सरपंच आहेत. नवनाथ यांचे बंधू विश्वास यांनी यासंदर्भात तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी योगेश गजानन राक्षे याच्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवडे गावातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव सुरू आहे. १९ एप्रिल रोजी नवनाथ यांची आरोपी योगेश राक्षे याच्या वडिलांशी भांडणे झाली होती.

या प्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. शनिवारी रात्री गावातील मंदिरात कीर्तन सुरू होते. रात्री बाराच्या सुमारास कार्यक्रम संपल्यानंतर ग्रामस्थ तेथून निघाले. नवनाथ आणि त्यांचा मित्र मंदिराच्या आवारात थांबले होते.

योगेश राक्षे त्याच्या साथीदारांसोबत तेथे आले. मंदिराच्या आवारात थांबलेल्या नवनाथ यांच्यावर हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून योगेश आणि त्याचे साथीदार तेथून पसार झाले. नवनाथ यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच ते मरण पावले होते. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. सांगवडे गावात पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील तपास करत आहेत.