समान पाणी वाटपासाठी शहरात आखण्यात आलेल्या योजनेवरून महापालिकेच्या खास सभेत शुक्रवारी चांगलेच नाटय़ घडले. या योजनेसाठी शहरातील पाणीपट्टीत बारा टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला या सभेत मंजुरी दिली जाणार होती. मात्र सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या मदतीने ही सभाच तहकूब केली. या तहकुबीला काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेने जोरदार विरोध केला. शिवसेनेने सभागृहातच आंदोलन केले आणि सभेत तसेच त्यानंतर महापौरांच्या दालनातही या तिन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
समान पाणी वाटपासाठी तसेच चोवीस तास पाणी पुरवठा करण्यासाठी जी योजना आखण्यात आली आहे त्या योजनेच्या मंजुरीसाठी शुक्रवारी महापालिकेची खास सभा बोलावण्यात आली होती. स्थायी समितीचे अंदाजपत्रक तयार होण्यापूर्वी या योजनेला मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते. ही मान्यता देतानाच पाणीपट्टीतील वाढीला मान्यता देण्याचाही प्रस्ताव सभेसमोर ठेवण्यात आला होता. पुढील पाच वर्षांत पूर्ण होणार असलेल्या या योजनेसाठी सुमारे दोन हजार ८०० कोटी रुपयांचा खर्च येणार असून या योजनेसाठी निधी उभारता यावा यासाठी आयुक्तांनी पाणीपट्टीमध्ये ५० टक्के वाढ सुचविली होती. तसेच २०४७ पर्यंत दरवर्षी पाच टक्के वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला होता. स्थायी समितीने आयुक्तांनी प्रस्तावित केलेली ५० टक्के वाढ रद्द करून ती १२ टक्के करावी असा निर्णय बहुमताने घेतला. तसेच पुढील पाच वष्रे दरवर्षी १५ टक्के आणि त्यापुढील काळात २०४७ पर्यंत दरवर्षी पाच टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्थायी समितीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या मदतीने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर केला होता. काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेने त्याला विरोध केला होता. खास सर्वसाधारण सभेतही शुक्रवारी हे तीनही पक्ष या प्रस्तावाला विरोध करण्याच्या तयारीनेच आले होते. शहर शिवसेनेच्या वतीने सभेच्या अगोदर काही तास महापालिका भवनासमोर आंदोलन करण्यात आले. सभेचे कामकाज सुरू होताच शिवसेनेचे नगरसेवक हातात कापडी फलक आणि झेंडे घेऊन घोषणा देतच सभागृहात दाखल झाले. त्यांच्यासोबत काँग्रेस आणि मनसेच्या सदस्यांनीही पाणीपट्टी वाढीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत राष्ट्रवादी आणि भाजपचा निषेध केला. ही घोषणाबाजी सुरू असतानाच सभागृहनेता शंकर केमसे यांनी मुरुड दुर्घटनेतील विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभा तहकूब करावी अशी उपसूचना मांडली. यावरून शिवसेना, काँग्रेससह मनसेच्या सदस्यांनी पुन्हा घोषणाबाजी करत तहकुबीला विरोध केला.
सभेत सुरू असलेल्या गोंधळातच महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी नगरसचिवांना मतदान पुकारण्याचे आदेश दिले आणि नगरसचिव सुनील पारखी यांनी तहकुबीवर मतदान घेतले. सभा तहकुबी ५२ विरुद्ध ४७ मतांनी मंजूर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने तहकुबीच्या बाजूने तर काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेच्या सदस्यांनी तहकुबीच्या विरोधात मतदान केले. महापौरांनी गोंधळातच सभा तहकुबी वाचून दाखवली आणि राष्ट्रगीत होऊन सभा संपली. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी महापौरांच्या दालनात जाऊन याबाबत नाराजी व्यक्त करत तेथेही घोषणा दिल्या.