पिंपरीत भाजप नेत्यांकडून ‘निवडणूक धोरण’ जाहीर

पिंपरी पालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वाधिक गर्दी झालेल्या भारतीय जनता पक्षाने गुरूवारी पक्षाचे ‘निवडणूक धोरण’ जाहीर केले. त्यानुसार, निवडून येण्याची क्षमता असेल त्यालाच भाजपची उमेदवारी दिली जाईल. ज्याची क्षमता नाही असे पक्षाला वाटेल, त्यास उमेदवारी मिळणार नाही, असे भाजपने स्पष्ट केले आहे. तिकीट वाटपात कोणावरही अन्याय होणार नाही, असा दावा करत शिवसेना-रिपाइंसह महायुतीसाठी भाजप आग्रही असल्याचा पुनरूच्चार या वेळी करण्यात आला.

भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, नव्याने भाजप परिवारात आलेले आमदार महेश लांडगे यांनी बुधवारी संयुक्तरीत्या पत्रकार परिषद घेत निवडणुकीसंदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट केली. माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार, सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस माउली थोरात, महिलाध्यक्षा शैला मोळक आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आमचे वैयक्तिक पातळीवर कोणाशी पटणार नसले तरीही त्याचा पक्षाच्या कामगिरीवर परिणाम होऊ देणार नाही, अशी ग्वाही या नेत्यांनी या वेळी दिली.

जगताप म्हणाले, पालिकेत भाजपची सत्ता प्रस्थापित करण्याचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. पक्षाकडे इच्छुक भरपूर आहेत. ‘नवे-जुने’ मतभेद नाहीत. महायुतीसाठी आम्ही आग्रही आहोत. राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे पुराव्यानिशी उघड करणार आहोत. लांडगे म्हणाले,की कोणतीही अट ठेवून पक्षात आलो नाही. मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक वाटले म्हणून भाजपमध्ये आलो. माझ्यामुळे युतीची अडचण होणार नाही. समर्थकांपैकी निवडून येण्याची क्षमता असेल त्यांनाच उमेदवारी मिळेल. भोसरीतील सर्व उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करू. साबळे म्हणाले,की लांडगे अपक्ष आमदार आहेत. ते यापुढे भाजपशी सलग्न म्हणून राहणार आहेत. लांडगे यांच्या प्रवेशामुळे भाजपचे बळ वाढणार आहे.

आसवानी विरूद्ध आसवानी?

पिंपरीगावातील प्रभागात (क्रमांक २१) राष्ट्रवादीने खुल्या गटासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष डब्बू आसवानी यांची उमेदवारी निश्चित केली आहे. भाजपने प्रत्युत्तरादाखल काँग्रेस नगरसेविका सविता आसवानी यांचे पती धनराज उर्फ धन्ना आसवानी यांचा भाजप प्रवेश घडवून त्यांनाच रिंगणात उतरवले आहे. धन्ना आणि डब्बू आसवानी हे चुलत बंधू आहेत. भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत धन्ना आसवानी यांच्या उमेदवारीची घोषणा केली.