गेल्या काही काळात भाजपने पक्षामध्ये सर्रासपणे गुंडांना प्रवेश दिला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुंडांची ही आयात जाणीवपूर्वक करण्यात आली आहे. त्यामुळे गुंडांचा पक्ष ही भाजपची ओळख बनली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. ते मंगळवारी पिंपरी चिंचवडमधील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अजित पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेकडून बऱ्यापैकी उमेदवार उभे करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर भाजपने अन्य पक्षांमधील उमेदवार आयात करण्याचा धडाका लावला आहे. बहुमत प्राप्त करण्यासाठी पक्षातील कार्यकर्त्यांशिवाय बाहेरचे कार्यकर्ते आयात करण्याचे धोरण भाजपने सुरू केले. यामध्ये अनेक गुंडांनाही पक्षात प्रवेश देण्यात आला. प्रिंट आणि इलेकट्रॉनिक मीडियाने हे मुद्दे लावून धरले. यासंदर्भातील क्लिपदेखील व्हायरल झाल्या, की ज्यांच्यावर तडीपार ची कारवाई केली होती, मोक्काच्यासंदर्भात नोटीस दिल्या होत्या, ज्यांच्यावर खुनांच्यासंबंधी आरोप होता, खंडणीचे गुन्हे दाखल झाले होते, अशा लोकांनाही भाजपने सर्रास प्रवेश देण्यास सुरुवात केली. भाजपने आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र आता राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. आता त्यांना राष्ट्रवादीचे नेते भ्रष्टाचारी वाटत नाहीत, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

दरम्यान, काँग्रेससोबतच्या आघाडीसंदर्भात बोलताना यासंदर्भातील चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन उमेदवार निश्चित करु. सन्मानपूर्वक आघाडी झाल्यास आमची भूमिका सकारात्मक आहे. आघाडीचे जागा वाटप २००४ आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या सूत्राप्रमाणे व्हावे. मात्र सन्मानपूर्वक आघाडी न झाल्यास पिंपरीत १२८ जागा स्वबळावर लढवण्याची आमची तयारी आहे. येत्या २-३ दिवसांत जागावाटपाबाबत भूमिका निश्चित होण्याची शक्यता आहे, असे पवार यांनी सांगितले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणी आम्हाला आरे केले तर आम्ही का रे करून उत्तर देऊ; आमच्या वाटेला गेल्यावर बघ्याची भूमिका घेणार नाही , असेही पवार यांनी ठणकावून सांगितले.