पुणे आणि पिंपरीतील महापलिका निवडणुकांचा निकाल गुरुवारी लागला. पुण्यात भारतीय जनता पक्षाने तब्बल ९८ जागा मिळवित निर्विवाद बहुमत मिळविले. तर पिंपरीतही ७७ जागा मिळवून भाजपने सत्ता संपादन केली. पुण्यात कसबा, पर्वती, शिवाजीनगर हे भाजपचे बालेकिल्ले राखण्यात पक्षाला यश आले. त्यातील पर्वती आणि शिवाजीनगर मतदारसंघात ‘शत प्रतिशत’ भाजपचे उमेदवार विजयी झाले. तर कोथरूड, वडगांवशेरी विधानसभा मतदारसंघातही अनुक्रमे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत बहुतांश जागांवर कमळ फुलले. खडकवासला विधानसभा व हडपसर मतदारसंघात भाजपला संमिश्र यश मिळाले असले तरी या प्रभागात राष्ट्रवादीला अपेक्षित वर्चस्व राखता आले नाही. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात मात्र काँग्रेसने तुलनेने बरे यश मिळविले. या निवडणुकीच्या निमित्ताने पुणे आणि पिंपरीतील आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. निवडणूक निकालांच्या पाश्र्वभूमीवर विधानसभा मतदारसंघातील कामगिरीचे हे विश्लेषण.

 

कोथरुड विधानसभा मतदारसंघ

भाजपची ताकद वाढली

प्रतिनिधी, पुणे

शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या लक्षणीय यशामुळे या विधानसभा मतदारसंघातील पक्षाची ताकद वाढली आहे. शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना धूळ चारत या मतदारसंघातील १९ जागांपैकी तब्बल १५ जागा भाजपने जिंकल्या आहेत. सर्वपक्षीय मिळून पाच नगरसेवकांना या प्रभागात पराभवाचा धक्का बसला असून विशेष म्हणजे शिवसेनेची ताकद कमी करण्यात भाजपला यश आल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पहिल्यापासूनच वर्चस्वाची लढाई असल्याचे दिसत होते. त्यामुळे युतीची चर्चा सुरू असतानाही या प्रभागात स्वबळावर लढण्याती तयारी दोन्ही पक्षांकडून करण्यात आली होती. युती संपुष्टात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच या प्रभागात सभा घेऊन हा भाग भाजपसाठी महत्त्वाचा असल्याचे दाखवून दिले होते. निवडणुकीत उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये गोंधळ उडाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद या मतदारसंघात उमटले होते. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आव्हान आमदार मेधा कुलकर्णी यांच्यापुढे होते.

मुळातच शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या प्रभागात सेनेची मोठी ताकद होती. विधानसभा निवडणुकीवेळी युती तुटल्यामुळे या मतदारसंघातून प्रा. मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्या विजयी झाल्या. त्यापूर्वी शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे यांनी या मतदारसंघाचे म्हणून प्रतिनिधित्व केले होते. मात्र भाजपच्या ताब्यात हा मतदारसंघ आल्यानंतर सेना-भाजपमधील कुरबुरीही वाढल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनी, एरंडवणा-हॅपी कॉलनी, कर्वेनगर, बावधान-कोथरूड डेपो, रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर या प्रभागात भाजपने निर्भेळ यश मिळविल्याचे दिसून येत आहे. पाच प्रभागांतून भाजपचे १५ नगरसेवक विजयी झाले आहेत. बावधन-कोथरूड डेपो, कर्वेनगर आणि एरंडवणा-हॅपी कॉलनी या प्रभागात पक्षाचे संपूर्ण पॅनेल विजयी झाले आहे.

 

चिंचवड विधानसभा मतदारसंघ

मतदारसंघात  ‘कमळां’चा पाऊस

प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी पालिकेतून राष्ट्रवादी काँग्रेसला हद्दपार करताना भाजपचा सेनापती म्हणून चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जगतापांच्या चिंचवड मतदारसंघात कमळाचा अक्षरश: पाऊस पडला असून त्यामुळे भाजपचा सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रभावक्षेत्रातील आठपैकी सहा जागांवर भाजप विचाराचे नगरसेवक निवडून आले असून शिवसेनेच्या पदरात अवघ्या दोन जागा पडल्याने बारणे यांना धक्का बसला आहे.

सांगवी ते किवळे दरम्यानच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पट्टय़ात भाजपचे उमेदवार मोठय़ा संख्येने निवडून आले आहेत. लक्ष्मण जगताप यांनी नियोजबद्धपणे मांडणी केल्याचे ते फलित आहे. सांगवी, नवी सांगवी, िपपळे गुरव येथील सर्व जागा मिळतील, असा त्यांचा अंदाज होता. त्यातील ११ जागेवर भाजपचे अधिकृत तर एका जागी बंडखोर निवडून आला. िपपळे सौदागरमध्ये चारची अपेक्षा असताना दोन जागा मिळाल्या. मात्र, रहाटणी, चिंचवडेनगर, िपपळे निलखला पैकीच्या पैकी जागा मिळाल्याने त्याची भरपाई झाली. शिवसेनेशी युतीची चर्चा सुरू असताना थेरगावच्या आठ जागांवरून तिढा निर्माण झाला होता. खासदार बारणे यांनी आठही जागा शिवसेनेला हव्यात, अशी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र, स्वतंत्रपणे निवडणुका झाल्यानंतर बारणे यांना अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. उर्वरित सहा जागांवर भाजप विचाराचे नगरसेवक निवडून आले आहेत. वाकडला मात्र शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी चारपैकी तीन जागा निवडून आणून सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. भाजपचा वाकड-पुनावळे प्रभागाचा संपूर्ण पॅनेल निवडून येईल, असा विश्वास जगतापांना होता. मात्र, शिवसेनेचे कलाटे दोन सहकाऱ्यांसमवेत निवडून आले. चौथ्या जागेवर राष्ट्रवादीचे मयूर कलाटे निवडून आले. मयूर व राहुल कलाटे यांनी कोणत्या गटातून निवडणूक लढवावी, यावरून बराच काथ्याकूट झाला होता. ते समोरासमोर न लढल्यास ‘मॅचफिक्सिंग’ होईल, अशी शंका व्यक्त होत होती. दोघेही वेगवेगळ्या गटातून निवडून आल्याने या चर्चेला नव्याने सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांचा पराभव काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनाला चटका लावून गेला. निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे भाजपचे चिंचवड मतदारसंघातील स्थान आणखी भक्कम झाल्याचे मानले जाते.

पर्वती विधानसभा मतदारसंघ

शत प्रतिशत भाजप

प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीच्या चार महिने आधीपासूनच सुरू झालेल्या पक्षसंघटनात्मक बांधणीचा फायदा पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपला झाला. या प्रभागात भाजपने अपेक्षित वर्चस्व राखले. या विधानसभा मतदारसंघातील २७ पैकी तब्बल २३ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाल्यामुळे पर्वतीमध्ये शतप्रतिशत भाजप असेच चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या काही दिग्गज नगरसेवकांनाही भाजपच्या नवख्या उमेदवारांनी पराभवाची धूळ चारली आहे. तर बहुतांश प्रभागात पक्षाचे चारही उमेदवार निवडून आणण्यात पक्षाला यश आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रमुख पक्षांच्या ताकदीचा विचार केला तर भाजपला मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात असल्याचे यापूर्वी झालेल्या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होते. शिवसेनेचाही या मतदारसंघात जोर आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून शहरातील राजकीय परिस्थिती बदलली असली तरी पर्वतीमध्ये मात्र त्याचा फारसा परिणाम जाणवलेला नव्हता. त्यामुळे निवडणुकीच्या काही महिने आधीपासून पक्षाच्या संघटानात्मक बांधणीवर भर देण्यात आला होता. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपला असलेले अनुकूल वातावरण लक्षात घेऊन या विधानसभा मतदार संघातील अन्य पक्षांच्या कार्यकते-पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये काँग्रेसचे माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, शंकर पवार, हरिदास चरवड हे भाजपमध्ये दाखल झाले. तर दिनशे धाडवे या राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे सर्वजण पक्षाच्या तिकिटावर निवडूनही आले.

पर्वती-नवी पेठ, सॅलीसबरी पार्क-महर्षीनगर, जनता वसाहत-दत्तवाडी, सनसिटी-हिंगणे खुर्द, सहकारनगर-पद्मावती आणि मार्केटयार्ड-लोअल इंदिरानगर, अप्पर-सुपर इंदिरा नगर या प्रभागातून भाजपला निर्भेळ यश मिळाले. जनता वसाहत-दत्तवाडी आणि सहकानगर-पद्मावतीचा अपवाद वगळता अन्य प्रभागातून भाजपचे संपूर्ण पॅनेल विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रसेचे माजी सभागृहनेता आणि नगरसेवक सुभाष जगताप यांना महेश बावळे या भाजपच्या उमेदवाराने पराभूत केले. चार प्रभागात भाजपला निर्भेळ यश मिळाले. शिवसेनेला एक, काँग्रेसला एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली.

 

कसबा विधानसभा मतदारसंघ

कसब्यातील विजयाला पराभवाची किनार

प्रतिनिधी, पुणे

भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातील तीन प्रभागांमध्ये भाजपला यश मिळाले. पण या यशाला एका धक्कादायक पराभवाचीही किनार दिसून आली. तीन प्रभागांत अवघ्या सहा जागांवरच भाजपला समाधान मानावे लागले आहे. या मतदारसंघातील एका प्रभागातून विजयी झालेले भाजपचे संपूर्ण पॅनेल हीच पक्षाच्या दृष्टीने जमेची बाजू ठरली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संपुष्टात आलेली ताकद ही बाबही या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या पथ्थ्यावर पडली आहे.

महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाल्यापासूनच कसब्यातील लढतींकडे सर्वाचे लक्ष लागले होते. प्रभागांची फेररचना झाल्यानंतर तीन प्रभाग पूर्णपणे तर दोन प्रभाग निम्मे या विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असल्याचे स्पष्ट झाले. पालकमंत्री गिरीश बापट यांचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात पहिल्यापासूनच उमेदवार निवडीचा प्रश्न होता. कसब्यातील उर्वरित प्रभागात मनसे आणि काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे बऱ्यापैकी वर्चस्व होते. त्यामुळे कसब्यातील शनिवार पेठ-सदाशिव पेठ, कसबा पेठ-सोमवार पेठ आणि रास्ता पेठ-रविवार पेठ या प्रभागातच पक्षाकडून लक्ष केंद्रित करण्यात आले होते. उमेदवारीचा पेच, विद्यमान नगरसेवकांना डावलून देण्यात आलेली उमेदवारी, काँग्रेसचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा भाजप प्रवेशाचा प्रयत्न अशा कारणांमुळे हा प्रभाग चर्चेत आला होता.  भाजपला रोखण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी एकत्र येण्याच्या हालचालीही स्थानिक पातळीवर सुरू केल्या होत्या.  मात्र त्यातील शनिवार पेठ-सदाशिव पेठ या प्रभागातच भाजपला निर्भेळ यश मिळाले. कसब्यात भाजपचे गटनेता गणेश बीडकर यांना धंगेकर यांच्याकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. कसबा पेठ-सोमवार पेठ आणि रास्ता पेठ-रविवार पेठ या प्रभागात मात्र भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. भाजपच्या या प्रभागात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही काही जागा मिळविल्या. या तिन्ही पक्षांना प्रत्येकी दोन-दोन जागा या भागात मिळाल्या.

 

भोसरी विधानसभा मतदारसंघ

भोसरीतून ‘धनुष्यबाण’ गायब

प्रतिनिधी, पिंपरी

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांना दणदणीत मताधिक्य देणारा आणि विधानसभा निवडणुकीत सेनेच्या उमेदवार सुलभा उबाळे यांना भरभरून मतदान करणाऱ्या भोसरी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीदरम्यान वेगळेच चित्र पुढे आले आहे. निगडी ते दिघी या भोसरी मतदारसंघातील पट्टय़ात एकही शिवसेनेचा नगरसेवक निवडून येऊ शकला नाही. त्यामुळे सेनेला धक्का बसला आहे. भाजपसाठी असलेले पोषक वातावरण आणि आमदार महेश लांडगे यांच्या झंझावातामुळे भोसरीतून ‘धनुष्यबाण’ गायब झाला आहे.

शहरभरातून शिवसेनेचे केवळ नऊ नगरसेवक निवडून आले आहेत, त्यापैकी एकही नगरसेवक भोसरीतून आलेला नाही. गटनेत्या सुलभा उबाळे याच मतदारसंघातील निगडी प्रभागातून लढल्या. मात्र, त्या पॅनेलसह पराभूत झाल्या. उबाळे यांनी यापूर्वी दोन वेळा भोसरी विधानसभा निवडणूक लढवली. २००९ मध्ये राष्ट्रवादीचे बंडखोर विलास लांडे यांच्याकडून त्या थोडक्यात पराभूत झाल्या होत्या. २०१४ मध्ये तत्कालीन राष्ट्रवादीचे बंडखोर महेश लांडगे यांच्याकडून त्या पराभूत झाल्या. विधानसभेत यश न मिळाल्याने स्वत:च्या राजकीय भवितव्यासाठी उबाळे यांना पालिकेत निवडून येणे गरजेचे होते. मात्र, येथील पराभवामुळे त्यांच्या ‘लक्ष्य’ भोसरी विधानसभेच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भाजप-शिवसेना युतीची जेव्हा चर्चा सुरू होती, तेव्हा उबाळे यांनी विरोधाची भूमिका घेतली होती. भाजपकडून खूपच कमी जागा देण्यात येत असल्याचा त्यांचा नाराजीचा सूर होता. त्यानंतर, खासदार आढळरावांनाही तोच सूर आळवत युतीला विरोधाची भूमिका घेतली होती. स्वबळाने निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मात्र शिवसेना नेत्यांची पंचाईत झाली होती. अनेक ठिकाणी अपेक्षित उमेदवार मिळत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे काही ठिकाणी लढतीपूर्वीच निकाल स्पष्ट झाला होता.  निगडी ते दिघी दरम्यानच्या पट्टय़ात एकाही जागेवर शिवसेनेला विजयी होता आले नाही. उबाळे यांच्याप्रमाणेच धनंजय आल्हाट निवडून येतील, असे शिवसेनेचे गणित होते. मात्र, उबाळे या राष्ट्रवादीच्या सुमन पवळे यांच्याकडून तर आल्हाट भाजपच्या नितीन काळजे यांच्याकडून पराभूत झाले.

विश्लेषण: अविनाश कवठेकर, बाळासाहेब जवळकर