स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पहिल्या स्थानावर झेप घेतलेल्या भारतीय जनता पक्षाने आगामी २०१९ च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आतापासूनच व्यूहरचना सुरू केली आहे. चिंचवडला झालेल्या भाजपच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीतील चर्चेचा सूर आणि पक्षवर्तुळातील एकूणच वातावरण पाहता, कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा निर्धार भाजप नेतृत्वाने केला असून त्या दिशेने वाटचालही सुरू केली आहे. पक्ष वाढवणे व त्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लावणे हा  एकच मंत्र यानिमित्ताने देण्यात आला आहे.

भाजपची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक पिंपरी-चिंचवडला झाली. पवारांचा बालेकिल्ला असलेल्या िपपरी महापालिकेतील सत्ता भाजपने खेचून आणली म्हणून ही बैठक शहरात घेण्यात आली. बैठकीच्या निमित्ताने िपपरी-चिंचवड ‘भाजपमय’ करत जोरदार वातावरणनिर्मिती तसेच शक्तिप्रदर्शन करण्याची संधी शहर भाजपने सोडली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, डॉ. सुभाष  भामरे, हंसराज अहिर, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, विनोद तावडे, पंकजा मुंडे, गिरीश बापट, दिलीप कांबळे, एकनाथ खडसे असे पक्षातील दिग्गज  नेते, आमदार-खासदार झाडून उपस्थित असलेल्या या बैठकीत बरेच ‘चिंतन’ झाले. मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी राज्यभरातील परिस्थितीचा आढावा घेतला. चौथ्या क्रमांकावर असलेला भाजप पहिल्या स्थानावर आला. आमदार, खासदारांची संख्या वाढली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने मोठी झेप घेतली. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा सगळीकडे भाजपची विजयी घौडदौड सुरू असल्याचे सांगत ही विजयाची मालिका यापुढेही सुरूच राहणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांना वाटतो आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकांची तयारी आतापासून सुरू केली, त्याच धर्तीवर मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनीही महाराष्ट्रात तशी पाऊले टाकण्यास सुरूवात केली आहे. स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सोबत घेतलेल्या शिवसेनेशी ‘संसार’ ठेवण्याची भाजपची कोणतीही इच्छा दिसून येत नाही.

खासदार राजू शेट्टी, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आदी भाजपवर नाराज आहेत. स्वबळावर सत्ता आणल्यास कोणाची मनधरणी करण्याची वेळ येणार नाही आणि पक्षाच्या ध्येयधोरणानुसार सत्ता राबवता येईल, हे लक्षात घेऊनच भाजप नेते कामाला लागले आहेत. तळागाळातील मतदारांशी संपर्क साधण्याचा हेतू ठेवून विस्तारक योजनेसारखे कार्यक्रम देऊन कार्यकर्त्यांना कामाला लावण्यात आले आहे. भाजपच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आतापासून सुरू केला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यास वेळीच प्रत्युत्तर देण्याच्या हेतूने मुख्यमंत्र्यांनी ‘संवाद यात्रे’ची घोषणा केली. या माध्यमातून २५ लाख शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांची माहिती दिली जाणार आहे. पक्षात वाढणाऱ्या गर्दीमुळे कितीही प्रश्न निर्माण होत असले तरी ‘पार्टी बढाव’ हा पक्षनेतृत्वाचा आदेश पाळून सर्वाना मुक्त प्रवेश दिला जात आहे. विरोधकांकडे ताकदीचे उमेदवार व त्यांच्या प्रचारासाठी कार्यकर्तेच राहता कामा नयेत, हीच त्यामागची खेळी मानली जाते.