पिंपरी प्राधिकरणाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी बैठका घेतल्या, तेव्हा ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी मुदत घेतली. मात्र, सहा महिन्यांनंतरही ‘जैसे थे’ परिस्थिती व केवळ ‘कागदी घोडे’ नाचवण्यात आल्याचे उघड झाल्याने आमदार भलतेच भडकले व त्यांनी आढावा बैठकीत थयथयाट केला.
अजितदादांचे ‘निकटवर्तीय’ सुरेश जाधव सध्या प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ते व्यवस्थित काम करत नसल्याची भाजप पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे. एकेकाळी अजितदादांचे जवळचे व सध्याचे भाजपचे आमदार असलेल्या जगताप यांना जाधव यांच्याकडून ‘असहकार’ होत असल्याने आमदारांनी यापूर्वीही जाधव यांच्या कार्यपध्दतीविषयी तक्रारी केल्या आहेत. मोशीतील आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, शेतकऱ्यांचा साडेबारा टक्के जमीन परतावा, मागासवर्गीयांना सदनिका व गाळ्यांचे वाटप, अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी ‘ले आऊट’ची पुनर्रचना, आरक्षणांचा विकास, अतिक्रमणे व नागरिकांच्या विविध अडचणींवर चर्चा करण्यासाठी जगताप यांनी जानेवारी व फेब्रुवारीत बैठका घेतल्या. तेव्हा यातील प्रश्न सोडवण्यासाठी जाधव यांनी अधिकाऱ्यांना निर्धारित मुदत देत तसे आदेशही दिले. सहा महिन्यांनंतर जगताप यांनी पुन्हा बैठक घेऊन या प्रश्नांची सद्यस्थिती विचारली असता ‘जैसे थे’ परिस्थिती दिसून आल्याने ते संतापले. त्यांनी मुख्याधिकारी जाधव यांच्यासह सर्वानाच फैलावर घेतले. या संदर्भात जगताप यांनी पत्रकारांना सांगितले, सहा महिन्यात प्रश्न सोडवण्याचे प्रयत्नही झाले नाहीत. प्राधिकरणाचे अधिकारी केवळ पगारापुरते आहेत. फाईली मार्गी लावण्याऐवजी त्या अडवून ठेवण्यात धन्यता मानतात. नागरिकांना उद्धट वागणूक दिली जाते, त्यांची पिळवणूक केली जाते. या संदर्भात विभागीय आयुक्तांकडे तक्रार करू.