कसब्याचे आमदार गिरीश बापट आणि पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या विरोधात पक्षाचे नेते नितीन गडकरी यांच्याकडे गेलेल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांची गडकरींनी चांगलीच पंचाईत केली. या शिष्टमंडळाला गडकरींनी प्रतिसाद तर दिला नाहीच, उलट अशाप्रकारे सुरू असलेले प्रयत्न योग्य नाहीत आणि तुम्ही काय ते प्रदेशाध्यक्षांना सांगा, असे सुनवायलाही गडकरींनी कमी केले नाही.
लोकसभेतील यशानंतर शहर भारतीय जनता पक्षातील काही जण आता विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक झाले असून त्यांच्याकडून उमेदवारी मिळण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. माजी खासदार प्रदीप रावत पर्वतीमधून लढण्यासाठी, तर महापालिकेतील गटनेता गणेश बीडकर कसब्यातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळेच कसब्याचे विद्यमान आमदार गिरीश बापट आणि पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांना हटवण्याची मागणी पक्षातून सुरू झाली असून या मागणीसाठी पक्षाचे शिष्टमंडळ सोमवारी गडकरी यांच्या भेटीसाठी मुंबईला गेले होते. ही मागणी थेट करणे शक्य नसल्यामुळे शिवाजीनगर मतदारसंघाच्या चर्चेसाठी आल्याचे चित्र शिष्टमंडळाने तयार केले होते.
रावत, बीडकर तसेच खासदार अनिल शिरोळे, माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्यासह अन्य काही इच्छुक तसेच काही पदाधिकारी व समर्थक अशा सर्वाच्या शिष्टमंडळाने गडकरींची भेट घेतल्यानंतर गडकरी यांनी मात्र त्यांना प्रतिसाद दिला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गडकरींनी या शिष्टमंडळाशी फारशा गांभीर्याने चर्चा केली नाही आणि त्यांचे म्हणणेही ऐकून घेतले नाही. उलट, अगदी थोडा वेळच चर्चेसाठी दिला आणि लगोलग सर्वाची बोळवण केली.
तुम्ही शिवाजीनगरच्या चर्चेपुरते आला आहात, तर तेवढय़ापुरतेच बोला. इतर आमदारांबद्दल बोलू नका. त्यांच्याबद्दल काही म्हणायचे असेल, ते प्रदेशाध्यक्षांना सांगा. असे करणे बरोबर नाही. पक्षाच्या निवडणूक निरीक्षकांसमोर तुम्ही म्हणणे मांडले पाहिजे, असेही गडकरी म्हणाले. त्या बरोबरच आपले नगरसेवक महापालिकेत ज्या पद्धतीने काम करत आहेत ते मला माहिती आहे. तुमच्या महापालिकेतील कामाबद्दल मी फार नाराज आहे. तिथे सुरू असलेली चुकीची कामे मला पटत नाहीत, असेही ऐकवायला त्यांनी कमी केले नाही. रावत पर्वतीसाठी इच्छुक असले, तरी गडकरी यांनी त्यांना ‘तुम्ही तर दहा वर्षांपूर्वी स्वत:च गाडीतून खाली उतरला आहात’ अशी आठवण रावत यांना करून दिली.
निम्हण यांच्या प्रवेशाबद्दल अद्यापही स्पष्टता नाही
काँग्रेसचे आमदार विनायक निम्हण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा मध्यंतरी जोरात होती. सध्या ही चर्चा थांबली असली, तरी शिवाजीनगरमध्ये बाहेरचा उमेदवार नको अशी आग्रही मागणी गडकरी यांच्याकडे करण्यात आली. मात्र, त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार निम्हण यांना पक्षात प्रवेश द्यायचा, का द्यायचा का द्यायचा नाही, याबाबत भाजपच्या नेतृत्वाने ठामपणे कोणताही निर्णय घेतलेला नाही.