*  दिवसात चार वेळा कपडे बदलणारे मोदी फकीर कसे?
*  अजित पवार यांची टीका

महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याची भाषा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाकडून नेहमीच जातीचे राजकारण करण्यात येते. प्रभू श्रीराम, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने त्यांचे राजकारण सुरू झाले आहे. भाजपकडून शिवरायांविषयी कधीही चांगले बोलले गेले नाही. मात्र, आता त्यांना महाराजांचा खोटा कळवळा आला आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. स्वत:ला फकीर म्हणवून घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसात चार वेळा कपडे बदलतात, एकेक जोड लाखो रुपये खर्चाचे असतात, अशी खिल्ली त्यांनी उडवली.

पिंपरी पालिकेच्या विविध विकासकामांचा प्रारंभ पवारांच्या हस्ते झाला, तेव्हा चिखलीतील सभेत ते बोलत होते.

पवार म्हणाले, निवडणुका जवळ येताच भाजपचे ‘मतांचे राजकारण’ सुरू होते. ‘स्मार्ट सिटी’साठी विचार करण्याची ते भाषा करतात. आतापर्यंत कोणी रोखले होते. इंदू मिलच्या जागेचे भूमिपूजन केले, तेथे आजपर्यंत एक टिकावही टाकलेला नाही. आता शिवरायांच्या नावाचे राजकारण चालवले आहे. भाजपकडून महाराजांविषयी कधीही चांगले बोलले गेले नाही. शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे ते मूठभर कोण होते. महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास दडपण्यासाठी यांनीच प्रयत्न केले. जेम्स लेन प्रकरणामागे कोण होते, याचा विचार करावा. महाराजांवर त्यांचे अचानक प्रेम कसे आले. भाजप नेहमी जातीयवादाचे राजकारण करते. केंद्राच्या निवडणुका लागल्या, की रामाचे नाव घ्यायचे. महाराष्ट्रातील निवडणुका लागल्या, की शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे, असे यांचे राजकारण आहे. शिवस्मारकासाठी जागा निवडण्यापासून सगळे काही आम्ही केले. केवळ ‘ना हरकत’ प्रमाणपत्राचे काम करणाऱ्या सरकारने स्वत:चा गाजावाजा किती केला. १८ कोटी रुपये फक्त जाहिरातींसाठी खर्च करण्यात आले, हा पैसा आला कुठून, याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे. मराठा आरक्षणाचा विषय तापलेला असताना नोटाबंदीचा विषय काढण्यात आला. नोटाबंदीचा त्रास जाणवू लागताच शिवस्मारकाचा विषय पुढे आणण्यात आला. नोटाबंदीला ५० दिवस होत आले तरी परिस्थिती सुधारली नाही. आपण मशीनद्वारे व्यवहार करतो आहोत. मात्र, त्याद्वारे अंबानी तसेच चिनी कंपन्यांना मोठे कमिशन पर्यायाने अब्जावधींचा फायदा मिळणार आहे. अदानी, अंबानी यांच्यासाख्या उद्योगपतींकडे सोन्याचे डबोले आहे. १८ कोटी रुपयांचा हिरा घालणारे उद्योगपती आपण पाहिले आहेत. अशांना सोन्याच्या मर्यादेचे नियम नाहीत, ही मंडळी बँकांच्या रांगांमध्ये दिसत नाहीत. दररोज एक परिपत्रक काढले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो आहे, यावर मोदी काही बोलत नाही. बाहेर काय चाललंय ते मोदींना कळत नाही, तसे सांगणारेही कोणी नाही. मुख्यमंत्र्यांकडेही ते धाडस नाही. मोदींनी डोळे वटारले तरी मुख्यमंत्री मान खाली घालतात.

पवार म्हणाले,

*  नरेंद्र मोदी म्हणजे ‘एकटा जीव सदाशिव’

*  संसद ग्राम विकास योजना फसवी आहे.

*  भाजपकडून महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याची भाषा.

*  पंतप्रधान व मुख्यमंत्री नागरिकांची दिशाभूल करतात.

*  नव्या दोन हजारांच्या नकली नोटा बाजारात