• पिंपरी भाजपचा ‘तीन वरून ७७ पर्यंत’चा प्रवास
  • पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

पिंपरीत भाजपचे तीन नगरसेवक होते, ते ७७ पर्यंत पोहोचवून पालिकेची सत्ता खेचून आणणाऱ्या ‘जायंट किलर’ पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते चिंचवडच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच पवारांचा अभेद्य बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका भाजपने ताब्यात घेतली आणि पवारांचा बुरूज ढासळला. त्याचपद्धतीने, सांगली, सोलापूर, कराड, इस्लामपूर अशा भल्या-भल्यांचे बुरूज भाजपच्या तडाख्याने ढासळले आहेत, अशी टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात केली.

पिंपरी पालिका पवारांकडे होती. अजित पवार शहराचे कारभारी होते. त्यांच्याकडील महापालिका भाजपने खेचून आणली. त्याचा विजय साजरा करण्यासाठीच चिंचवड येथे प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पालिकेची सत्ता हस्तगत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे यांचा मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व श्याम जाजू उपस्थित होते.

यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,की २०१७ च्या निवडणुकांमध्ये विकास व विश्वासामुळे विजय मिळाला आहे. जनतेने सत्तेतून सत्ता दिलीच, शून्यातूनही सत्ता दिली. नागपूरमध्ये ६४ चे १०८ झाले, तर लातूरमध्ये काहीच नव्हते, तेथे सत्ता आली. पिंपरीत पवारांचा बुरूज ढासळला. त्याचप्रमाणे, पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम, जयंत पाटील, विजयसिंह मोहिते अशा दिग्गजांचे किल्ले ढासळले. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडय़ात पक्षाचा चढता आलेख आहे. भाजप एखाद्या भागापुरता पक्ष नाही, त्याची व्याप्ती संपूर्ण राज्यात आणि देशात आहे.