पिंपरी पालिका मुख्यालयात जोरदार घोषणाबाजी
शहरातील पाच स्मशानभूमीत पर्यावरणपूर्वक गॅस शवदाहिनी बसवण्याच्या कामात लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भाजपने मंगळवारी पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात ‘तिरडी’ आंदोलन केले. जोरजोरात घोषणाबाजी करून आंदोलकांनी पालिका भवन दणाणून सोडले. सुरक्षा कर्मचारी तसेच पोलिसांशी आंदोलकांची बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनाच दमबाजी करण्यात आली. भाषणबाजी, चित्रीकरण, फोटोसेशन झाल्यानंतर आंदोलकांनी आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे मोर्चा वळवला. १५ दिवसात चौकशी करण्याचे आणि तोपर्यंत या विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.
वाकड, दापोडी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर आणि पिंपरी वाघेरे या पाच ठिकाणी स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसवण्यात येणार आहे. या निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा असल्याचा आरोप भाजपने केला आणि त्यासाठी मंगळवारी आंदोलन केले. सर्वप्रथम स्थायी समितीचे
अध्यक्ष डब्बू आसवानी यांच्या दालनासमोर तिरडी आंदोलन करत ठिय्या आंदोलन करण्यात आले. सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांशी आंदोलकांची यावेळी जोरदार बाचाबाची झाली. आंदोलकांनी पोलिसांनाही दमदाटी केली.

आसवानी यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले आणि चौकशीचे आश्वासन दिले. त्यानंतर, आंदोलक आयुक्तांच्या दालनासमोर आले. तिथेही भ्रष्टाचाराची प्रतिकात्मक अंत्ययात्रा नेण्यात आली. याही ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. आयुक्तांनी आंदोलकांशी चर्चा केली. १५ दिवसात चौकशी करू, तोपर्यंत संजय कुलकर्णी यांना सक्तीच्या रजेवर पाठवू, असे आश्वासन त्यांनी दिले. जवळपास तीन तास चाललेल्या या आंदोलनात भाजपच्या नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनामुळे स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय आठवडाभरासाठी तहकूब करण्यात आला.

संजय कुलकर्णी बैठकीला नव्हते. म्हणून मंगळवारी हा विषय चर्चेला घेतला नाही. पुढच्या बैठकीत निर्णय घेऊ, तोपर्यंत अभ्यास करू. भाजपच्या आंदोलनाचा व विषय पुढे ढकलण्याचा काही संबंध नाही.
– नारायण बहिरवाडे,
सदस्य, स्थायी समिती