* इच्छुकांची गल्ली ते दिल्ली ‘फिल्डिंग’ *  मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांपर्यंत वशिलेबाजी

पिंपरी पालिका निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्यालाही काहीतरी मिळाले पाहिजे, यासाठी नेत्यांना साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. शासकीय पदांपैकी कुठेतरी वर्णी लागावी, यासाठी भाजपमध्ये प्रचंड झुंबड उडाली आहे. सर्वाधिक मागणी ‘स्वीकृत’ नगरसेवकपदाला असून त्यासाठी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री यांच्यापर्यंत वशिलेबाजी सुरू आहे.

पिंपरी पालिका भाजपच्या ताब्यात आली असून निर्विवाद असे बहुमतही पक्षाला मिळाले आहे. पालिका सभागृहात १२८ सदस्यसंख्या आहे. त्यानुसार, पाच सदस्यांना स्वीकृत करता येणार आहे. पक्षीय बलानुसार पाचपैकी तीन सदस्य भाजपचे होणार आहेत. या तीन जागांसाठी पालिका निवडणूक न लढलेले अनेक ताकदीचे कार्यकर्ते रांगेत आहेत. शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे आदी नेत्यांचे समर्थक कार्यकर्ते ‘स्वीकृत’ होण्यास तीव्र उत्सुक आहेत. पक्षातील जुने कार्यकर्ते तसेच संघटनात्मक पदाधिकारी आस लावून बसले आहेत. अनेक महिला पदाधिकारी इच्छुकांच्या रांगेत आहेत. पराभूत झालेल्या काहींनी वेगळ्या मार्गाने प्रयत्न चालवले आहेत. नेत्यांच्या मुलांची नावेही चर्चेत आहेत. या सर्वानी आपापल्या पध्दतीने पाठपुरावा ठेवला आहे. स्थानिक नेते, हितचिंतक ‘हिरवा कंदील’ दाखवतील की नाही, अशी शंका असणाऱ्यांनी थेट पक्षश्रेष्ठींपर्यंत वशिले लावले आहेत. स्थानिक नेत्यांची जशी शिफारस यादी असेल, त्याचपध्दतीने मोठय़ा नेत्यांकडेही बरीच नावे गोळा झाली असतील, अशी चिन्हे आहेत. तिकीट कापण्यात आलेल्या एका कार्यकर्त्यांला स्वीकृत करण्याचे थेट मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतले आहे. तर, प्रदेशाध्यक्षांनी एका माजी उपमहापौरासाठी बरेच प्रयत्न चालवले आहेत. पालकमंत्र्यांकडे मोठी यादी असल्याचे सांगण्यात येते. मुंडे गटातील कार्यकर्त्यांनी बीडचा रस्ता धरला आहे.

पालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी सर्वच प्रभागात तीव्र चुरस होती. एकास उमेदवारी दिल्यानंतर अन्य इच्छुकांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे चित्र अनेक प्रभागांमध्ये दिसून आले. तेव्हा पक्षाच्या अधिकृत उमेवारांना धोका नको म्हणून पदांचे गाजर दाखवून अनेकांना माघार घ्यायला लावली, असे अनेक प्रभागात घडले. काही ठिकाणी चांगल्या कार्यकर्त्यांची तिकिटे कापण्यात आली. आता पालिकाजिंकली, आमचे काय ते बघा, असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. पदांच्या जागा मर्यादित असून इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या खूपच मोठी आहे. त्यामुळे एकाला संधी मिळाली तरी न मिळाल्याने नाराज होणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी राहणार आहे. त्यामुळे कोणीची वर्णी लावायची, हा नेत्यांपुढे पेच आहे.