‘वजनदार’ नेत्यांचा सोयीच्या प्रभागरचनेसाठी आटापिटा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नियोजित प्रभागरचनेवरून आरोप-प्रत्यारोपाचा ‘खेळ’ सुरू असल्याने राजकीय वातावरण तापलेले आहे. मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून भाजपच्या सोयीची प्रभागरचना केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे. तर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्या फायद्यासाठी प्रभागांची मोडतोड केल्याचा भाजपचा प्रत्यारोप आहे. दोन्हीही पक्षांसह शहरातील सर्वच ‘वजनदार’ नेत्यांनी स्वत:च्या प्रभावक्षेत्रात सोयीची रचना करून घेण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे.

पिंपरी पालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी शहरात चार सदस्यीय ३२ प्रभाग होणार आहेत. त्या प्रभागांच्या रचनेवरून शहरातील राजकारण तापले आहे. राज्यातील सत्तेचा आधार घेऊन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून भाजपने स्वत:च्या फायद्याची प्रभागरचना करून घेतली आहे, अशी राष्ट्रवादीची तक्रार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी मुख्यमंत्री प्रभागरचनेत हस्तक्षेप करत असून भाजपचा फायदा होईल, अशी मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.

भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार, पालिकेतील सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. अजितदादांची अधिकाऱ्यांवर जरब आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सोयीची प्रभागरचना झाल्याचा संशय भाजपने व्यक्त केला आहे. भाजपचे खासदार अमर साबळे यांनी थेट अजितदादांकडे बोट दाखवले असून या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.

राजकीय हीत जपण्याचा प्रयत्न

भाजप-राष्ट्रवादीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असले तरी दोन्ही पक्षाने शक्य तिथे आपले राजकीय हीत जपण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना, काँग्रेस, रिपाइं, मनसे यांना अपेक्षित असा भाव अधिकारी देत नसले, तरी त्या-त्या पक्षातील ‘प्रभावी’ नेत्यांनी स्वत:च्या नियोजित प्रभागासाठी सोयीची रचना करून घेताना सर्व कर्तबगारी पणाला लावली आहे. पिंपळे गुरव, सांगवी, थेरगाव, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी-प्राधिकरण, संत तुकारामनगर, संभाजीनगर, भोसरी आदी भागातील प्रभागरचना करताना त्या-त्या भागातील वजनदार नेत्याची मर्जी सांभाळण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारात प्रशासनाची पंचाईत झाली असून आयुक्तांचे सँडविच झाल्याचे वृत्त आहे. तथापि, या संदर्भात, कोणतेही भाष्य करण्यास अधिकारी तयार नाहीत.