firasta-blog_ambar-karve-670x200सध्या मुलाच्या शाळेला सुट्टी सुरु आहे, म्हणून परवा सहज त्याच्याबरोबर फिरायला पुण्याबाहेर पडलो. बऱ्याच दिवसांनी वाईच्या बाजूला गेलो होतो. पुण्याच्या जवळची ही बाजू मला कायमच आवडते. सहसा आजूबाजूला हिरवाई असते, पाण्याचे दुर्भिक्ष सहसा कधीच नसते. रस्त्याकडेच्या उसाच्या रसाच्या दुकानावर वाईच्या गणपतीला, काळूबाईच्या दर्शनाला आलेली भाबडी लोक भेटतात. त्यांच्या आपापसातल्या गप्पा ऐकण्यातही वेळ कसा जातो समजत नाही.
आम्हीही नेहमीप्रमाणे आधी वाईच्या गणपतीचे दर्शन घेऊन धोम धरणाकडे निघालो. ह्या दुष्काळच्या दिवसातही रस्त्याच्या कडेला उसाची डौलदार शेतं लक्ष वेधून घेत होती. उतरत्या उन्हात शेताच्या बाजूचा तो गारवा अनुभवत जरासा रेंगाळलो. पलीकडच्या काळ्याशार शिवारात, गावातल्या पोरांचा क्रिकेटचा खेळ मस्त रंगात आला होता. एकूणच प्रसन्न वातावरण जमून आलं होतं. त्याच मूडमध्ये पुढे धोम धरणाच्या चौपाटीवर पोचलो. बोट राईडकरता रांग लावलेली थोडीफार लोकं, घोडे, उंटवाले त्यांच्याबरोबर आईस्क्रीमची गाडीवाले, येणाऱ्या लोकांची वाट बघत थांबले होते. सगळीच पोरं उधळतात तसंच आमचं पोरगंही तिथे गेल्यावर अपेक्षेप्रमाणे उधळलंच. मग बोटीचा नंबर लागेपर्यंत उंटावरची फेरी झाली. बोट राईड झाल्यावर आमचा मोर्चा वळला घोडं पळवणाऱ्या एका मुलाकडे. त्या पोरानी आमच्या मुलाला सराईतपणे घोड्यावर उचलून मस्त फेरी रपेट मारून आणली. घोडेवालं पोरगं घोड्यापेक्षा जास्त चलाख होतं, तिथलाच बोरीव्ह गावातला राहणारा होता. शाळेच्या सुट्टीत आणि शनिवार, रविवार घोडा चालवायचं काम करतो. थोड्या गप्पा मारून जाऊका? असं नम्रपणे विचारत तो पुढच्या कस्टमरना गाठायला घोड्याला टाच देत निघून गेला.
karve-blogतेवढ्यात माझं लक्ष वेधून घेतलं एका छोट्या बाईकवर मुलांना चक्कर मारून आणणाऱ्या दुसऱ्या एका ८-९ वर्षांच्या मुलाकडे. त्याची बाईक म्हणजे अगदीच छोटी होती, आमच्या लहानपणी गल्लीबोळात, येवढ्याच छोट्या सायकली एक रुपया तासावर भाड्यानी मिळायच्या. त्याचीच आठवण झाली एकदम. तो पोरगा लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायला गाडीच्या इंजिनचा आवाज करत होता. आमचं पोरगं तर असलं काही दिसलं की त्या इंजिनच्या वरताण फुरफुरायला लागतं. त्यामुळे आता त्यावर बसून चक्कर मारणे ओघानेच आलं. पण त्या मुलाच्या वागण्याबोलण्यावरून तो गावातला नक्कीच दिसत नव्हता, म्हणून बायको आणि मी कुतूहलाने बोललो त्याच्याशी. तर समजलं तो आलाय हाच व्यवसाय करायला तेही डायरेक्ट मुंबईवरून. गेले ३-४ वर्षे दर उन्हाळ्याच्या सुट्टीत येतो. आदी भोसले हे नाव त्याचं. जन्मापासून मुंबईच्या पवईत राहणाऱ्या आदीचे घर मुळचे फलटणचे. वाईच्याजवळच राहणाऱ्या काकांच्याकडे सुट्टीत राहायला येतो, त्यांच्याकडे पडून असलेली ही गाडी तो दर उन्हाळ्यात येऊन धरणाच्या जवळ व्यवसायासाठी चालवायला आणतो. साधारण १० वर्षापर्यंतच्या मुलांना गाडी चालवता येते. ५-६ वर्षापर्यंतच्या लहान मुलांना त्यांच्या मागे बसून तो चक्कर मारून आणतो. त्याचा डेली टर्नओव्हर सांगत नाही बसत मी. पण तो दररोज साधारण ५०-६० मुलांना फेऱ्या मारून आणत आपली कमाई करून, शाळा सुरु व्हायच्या आधी परत आपल्या घरी पवईला परत जातो. आदीची घरची आर्थिक परिस्थिती एकंदर बोलण्यातून चांगलीच दिसत होती. तो बोलला नसला तरीही जी कमाई तो स्वतः करून आणतो, त्यातूनच त्याचा वर्षभराचा सगळा खर्च स्वतःच भागवतो, असा अभिमान दिसत होता मला त्याच्या बोलण्यातून.
हा आदी काय किंवा तो घोडेवाला मुलगा दोघेही, येणारे लोक पैसे कमी घ्यायला कितीही बार्गेन वगैरे करत असतानाही ही मुलं मात्र धीटपणे आपल्या किमतीवर ठाम होती. त्यांच्या वस्तूच्या किमतीची त्यांना जाण आहे. त्यामुळे त्यांची पहिली पसंती ते करत असलेल्या कामाला दिसली. फुकट गप्पा मारण्यायेवढा वेळ दोघांनाही नव्हता. दिवसभर उन्हात थांबून काम करायचं, येणाऱ्या लोकांची सेवा करून त्यांच्याकडून त्याचे पैसे चोख वसूल करायचे. आपल्या गाडीचा मेंटेनन्स करायचा किंवा घोड्याची खायची प्यायची व्यवस्था लक्ष देऊन करायची. ह्यातून उरलेल्या पैशातून शिक्षणाचा खर्च तर किरकोळीतच बाजूला पडतो. वरती ह्या वयात घरी पैसे देवू शकतात ही मुलं. त्यांचा आत्मविश्वास ‘तारीफे काबील’ वगैरे आहेच. विशेष म्हणजे तो वाढवायला त्यांना आज शहरातल्या इतर मुलांसारखी ही मुलं कुठल्या समर कॅम्पला जायची गरज लागत नाही.
अशा मुलांकडे बघितलं की मला कायम वाटतं, ह्या मुलांची पर्सनालिटी आत्ताच येवढी डेव्हलप झाल्ये, की ह्यांना पुढे गरज आहे फक्त थोड्याफार उद्योजकीय ‘थिअरी’ शिक्षणाची. प्रचंड पुढे जातील ही मुलं. ‘स्टार्टअप इंडिया’चा भाग तर हे न बोलता ह्या वयातच झालेत.
– अंबर कर्वे