प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिन आला, की पद्म पुरस्कार जाहीर केले जातात आणि त्यानंतर उताराच्या जागी पाणी वाहत यावे त्याप्रमाणे वाद-विवाद वाहत येतात. यंदा तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भगवे सरकार सत्तेवर आल्यामुळे तर या वादांना आणखी रंग चढणार, यात शंकाच नव्हती. सुदैवाने सायना नेहवाल आणि बाबा रामदेव यांच्या सारख्यांनी २६ जानेवारीपूर्वीच आपापल्या वादांचा वाटा उचलला आणि नेमक्या पुरस्कारांच्या घोषणेला निर्वेध मार्ग मिळाला.
पद्म पुरस्कारांच्या यंदाच्या यादीचे एक वैशिष्ट्य होते आणि ते म्हणजे या यादीत परदेशी व्यक्तींची संख्या नजरेत भरण्यासारखी होती. आंतरराष्ट्रीय मान्यता मिळविण्याच्या मोदी यांच्या प्रयत्नांचा तो भाग असावा कदाचित, परंतु, नेहमी १-२च्या संख्येने असलेल्या परदेशी व्यक्ती यंदा एकदम पाऊण डझनावर गेल्या. अनिवासी भारतीय आणि भारतीय मूळ असलेल्या व्यक्ती वेगळ्या. करीम अल हुसैनी आगा खान (फ्रान्स – पद्म विभूषण); डेविड फ्रावले (वामदेव), बिल गेट्स, मेलिंडा गेट्स (अमेरिका), सैचिरो मिसुमी (जपान) – सर्व पद्मभूषण; प्रो. जेकस बलेमोन (फ्रान्स), श्री जीन- क्‍लाउड केरीये (फ्रान्स), श्री जॉर्ज एल. हार्ट (अमेरिका) – सर्व पद्मश्री, अशी नावे यंदाच्या पद्म मानकऱ्यांमध्ये आहेत.
जर्मन संस्कृततज्ज्ञ डॉ. अॅनेट श्मिएडशेन हे या यादीतील एक प्रमुख नाव होय. त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे डॉ. अॅनेट सध्या भारतातच राहतात आणि त्यांचे पती रायनर श्मिएडशेन हे कोलकाता येथे मुख्य वाणिज्य राजदूत आहेत.
केवळ सहा महिन्यांपूर्वी भारतात जर्मन आणि संस्कृत भाषांना एकमेकांसमोर ठेवून दोन बाजू परस्परांशी भिडत होत्या. त्या पार्श्वभूमीवर डॉ. श्मिएडशेन यांना मिळालेला सन्मान हा आणखी विशेष ठरतो. “भाषा-भाषांमधील सहकार्य आणि भारत व भारताबाहेरील संस्कृत संशोधनाला एक प्रोत्साहन म्हणून आणि सामाजिक शास्त्रातील नारी शक्तीला सांकेतिक पाठिंबा या दृष्टीने मी या सन्मानाकडे पाहते,” असे डॉ. श्मिएडशेन म्हणाल्याचे जर्मन राजदूतावासाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
भारतातील जर्मन राजदूत माईकेल स्टाईनर यांची प्रतिक्रिया अधिक अर्थवाही आहे. “डॉ. श्मिएडशेन यांचे लक्षणीय कार्य तसेच संस्कृत भाषेतील जर्मन विद्वानांनी १९व्या शतकापासून केलेल्या योगदानाचा हा सन्मान आहे. जर्मन विद्यापीठांमधील भारतविद्या तसेच संस्कृतचे संशोधन आणि अध्यापन यांना जगभरात प्रतिष्ठा आहे. या प्राचीन व आधुनिक भाषांच्या क्षेत्रात दीर्घकालीन व यशस्वी भारतीय-जर्मन सहकार्य वाढविण्यास भारत सरकारच्या सन्मानामुळे उत्तेजनच मिळेल.”
डॉ. अॅनेट यांनी आधी बर्लिन विद्यापीठातून प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृत आणि विचार या विषयात पदवी घेतलेली आहे. त्यानंतर त्यांनी हुम्बोल्डट विद्यापीठातून उत्तर भारतातून पाचव्या ते नवव्या शतकादरम्यान बनलेली बौद्ध केंद्र आणि त्यासाठी गावे, भूमी व धनदान या विषयावर पीएचडी केली.
महाराष्ट्राच्या दृष्टीने डॉ. श्मिएडशेन यांची नोंद घेण्याचे आणखी एक कारण आहे. पाच वर्षांपूर्वी, २००९ साली त्यांनी मार्टिन ल्युथर युनिव्हर्सिटीतून हॅबिलिटेशन पदवी घेतली. त्यावेळी त्यांचा विषय होता, ‘प्रारंभिक मध्ययुगीन महाराष्ट्रातील शिलालेखीय संस्कृती आणि प्रादेशिक परंपरा. राष्ट्रकुट, शिलाहार आणि यादव राजघराण्यांच्या काळात ८व्या ते १३ व्या शतकात राजकीय सत्तेचे वैधानिकीकरण आणि अधिकृत धार्मिक प्रश्रय’. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ संस्कृत स्टडीज या संघटनेच्या मानद रिसर्च फेलो म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे.
तीन वर्षांपूर्वी जागतिक संस्कृत अधिवेशनात डॉ. श्मिएडशेन यांनी भाग घेतला होता. जगभरात संस्कृत तसेच अन्य प्राचीन भाषा व संस्कृतीच्या संशोधनासाठी आर्थिक तरतूद कमी होत आहे. त्यामुळे संस्कृत संशोधनात पीछेहाट होत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.
७३ वर्षांचे हुआंग बाओशेंग हे चीनी संस्कृततज्ज्ञ. त्यांनाही पद्मश्री देण्यात आली आहे. आपल्या पाच सहकाऱ्यांसह १० वर्षे खपून महाभारताचे भाषांतर करण्याचे श्रेय हुआंग यांच्या नावावर आहे. तसेच उपनिषदे, बौद्ध ग्रंथ व भगवद्गीतेचेही त्यांनी भाषांतर केले आहे. संस्कृतशिवाय पाली भाषेवरही त्यांचे प्रभुत्व आहे. या भाषांतील जगातील श्रेष्ठ संशोधकांपैकी एक अशी त्यांची ख्याती आहे.
फॉरेन लिटरेचर ऑफ दी चायनीज अॅकेडमी ऑफ सोशल सायन्सेस येथे ते संशोधन करीत असून, चायना फॉरेन लिटरेचर सोसायटी आणि इंडियन लिटरेचर रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थांचे ते अध्यक्ष आहेत. जी श्ये लीन यांचा वारसा ते समर्थपणे चालवत आहेत. श्ये लीन यांना चीनचा सर्वात महान भारतविद् मानण्यात येते. त्यांना तर २००८ साली भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा सन्मान केला होता. बाओशेंग हे श्ये लीन यांचेच शिष्य आहेत.
जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि भारतातील आधुनिक विद्वान यांच्या कृतींचा अभ्यास करता यावा, म्हणून श्ये लीन यांनी आपल्याला जर्मन व आधुनिक भारतीय भाषा शिकायला सांगितले होते, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. यावरून त्यांचा अभ्यास किती खोल गेला असावा, याची कल्पना येते.
ओबामांच्या दौऱ्यामुळे असावे कदाचित, या तपशीलांकडे कोणाचे लक्ष गेले नाही. परंतु, परराष्ट्र धोरणावरील आपला भर आणि विचारसरणीतून आलेले संस्कृतप्रेम, याची अशी सुंदर सांगड मोदी सरकारने पहिल्या प्रजासत्ताक दिनी घातली आहे. आता पुढे काय होते ते पाहायचे!
– देविदास देशपांडे
devidas@didichyaduniyet.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)