शासकीय रक्तपेढय़ांमध्ये संपूर्ण रक्त (होल ब्लड) आणि तांबडय़ा रक्तपेशींसाठी आकारल्या जाणाऱ्या सेवा शुल्कात शासनाने सुधारणा केली असून या दोहोंवरील सेवाशुल्क दोनशे रुपयांनी कमी करण्यात आले आहे. सुधारित दरानुसार या दोन्ही प्रकारच्या रक्तपिशव्यांसाठी ८५० रुपये सेवा शुल्क ठरवण्यात आले आहे.
जून २०१४ मध्ये रक्तावरील सेवा शुल्कात शासनाने वाढ केली होती. त्यामुळे पूर्वी शासकीय रक्तपेढीत प्रत्येकी ४५० रुपयांना मिळणारे पूर्ण रक्त व तांबडय़ा रक्तपेशींसाठी प्रतिपिशवी १०५० रुपये आकारले जाऊ लागले. आता हे सेवा शुल्क दोनशे रुपयांनी कमी करून प्रत्येकी ८५० रुपये ठेवण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांनी २०१४ च्या हिवाळी अधिवेशनात शासकीय रक्तपेढय़ांमध्ये रक्त व रक्तघटकांसाठी आकारण्यात येणाऱ्या सेवा शुल्कात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शासनाने २७ एप्रिलला काढलेल्या परिपत्रकात सुधारित सेवा शुल्क नमूद केले आहे.
औंध रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या प्रमुख डॉ. छाया कलाले म्हणाल्या, ‘‘रक्ताची विक्री केली जात नसून रक्तावर केल्या जाणाऱ्या पाच आवश्यक चाचण्यांचा खर्च रक्तपिशवीवर लावलेला असतो. रक्त घेण्यापूर्वी व्यक्तीची हिमोग्लोबिन चाचणी केली जाते. रक्तसंकलनानंतर त्याच्या रक्तगट तपासणीबरोबरच एचआयव्ही, हिपेटायटिस बी, हिपेटायटिस सी, मलेरिया आणि ‘व्हेनेरिअल डिसिज रीसर्च लॅबोरेटरी टेस्ट’ (व्हीडीआरएल) या चाचण्या केल्या जातात. औंध रुग्णालयात केवळ संपूर्ण रक्त उपलब्ध होत असून ती रक्तपिशवी आता ८५० रुपयांना मिळू लागली आहे.’’
तांबडय़ा रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन असल्यामुळे ज्या वेळी अ‍ॅनिमियासारख्या आजारात रुग्णाचे हिमोग्लोबिन कमी होते, तेव्हा तांबडय़ा रक्तपेशी दिल्या जातात. अपघात किंवा शस्त्रक्रियेदरम्यान मोठय़ा प्रमाणावर रक्त वाहून गेले तर त्या वेळी संपूर्ण रक्त दिले जाते. ‘नवीन संकल्पनांनुसार संपूर्ण रक्त देण्यास प्राधान्य देण्याऐवजी शरीरातील रक्ताचे प्रमाण (व्हॉल्यूम)वाढवायचे असेल, तर प्लाझमा हा रक्तघटक दिला जातो व जोडीने हिमोग्लोबिनसाठी तांबडय़ा पेशी दिल्या जातात,’ असे केईएम रक्तपेढीचे प्रमुख डॉ. आनंद चाफेकर यांनी सांगितले.