पिंपरीच्या विद्यमान महापौर शकुंतला धराडे यांची निर्धारित सव्वा वर्षांची मुदत 23bokadपूर्ण होत आल्याने शहरात महापौर बदलाचे वारे वाहू लागले आहेत. महापौर तूर्त राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत नसल्याने पुढील घडामोडी रंगतदार होणार आहेत. आरक्षणामुळे महापौरपदाच्या स्पर्धेत अवघे दोनच दावेदार शिल्लक आहेत, त्यापैकी नेमकी कोणाची निवड करायची, असा वेगळाच ‘पेच’ सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसपुढे आहे. कारण, महापौरपदाचे दोन्ही दावेदार ‘कारभारी’ अजित पवार यांच्याशी फारकत घेतलेल्या ‘त्या’ नेत्यांचे समर्थक आहेत.
महापौरपदासाठी अनुसूचित जमातीचे आरक्षण आहे. पिंपरी पालिकेत या प्रवर्गातील अवघे तीनच नगरसेवक असून तिघेही राष्ट्रवादीचे आहेत. महापौर धराडे त्यापैकी एक असून पिंपळे गुरवचे रामदास बोकड व दिघीच्या आशा सुपे हे अन्य दोन सदस्य आहेत. अडीच वर्षांत प्रत्येकी सव्वा वर्षे याप्रमाणे दोन महापौर करण्याचे राष्ट्रवादीचे नियोजन आहे. त्यानुसार, प्रथम महापौर झालेल्या धराडे यांची मुदत संपत आली असून उर्वरित दोघे यापुढील दावेदार आहेत. एके काळी अजितदादांचे उजवे हात असलेले लक्ष्मण जगताप राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेले. धराडे व बोकड त्यांचेच समर्थक आहेत. राजकीय सोयीसाठी ‘गॉडफादर’ दुसरीकडे गेले. मात्र, पद वाचवण्यासाठी धराडे, बोकड अद्याप राष्ट्रवादीतच आहेत. मुदत संपल्यानंतर महापौर भाजपमध्ये जातील की राष्ट्रवादीत राहतील, याविषयी उत्सुकता आहे. धराडे यांच्यानंतर पुन्हा जगताप समर्थकाला पद मिळेल का, याविषयी साशंकता आहे. आशा सुपे हे पर्यायी नाव आहे. मात्र, त्यांचे ‘गॉडफादर’ विलास लांडे हे देखील पवारांच्या खूप जवळचे होते. मात्र, सध्या लांडे राष्ट्रवादीत आहेत की नाहीत, याविषयी कोणालाही खात्री नाही. ज्या पद्धतीने त्यांचा पराभव झाला, त्यामुळे ते दुखावलेले आहेत. राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांनी त्यांना घरी बसवले, शक्य असूनही अजितदादांनी त्यांना थोपवले नाही, यामागे सूत्रबद्ध नियोजन असल्याची भावना लांडे समर्थकांमध्ये आहे. ते शिवसेना किंवा भाजपचा पर्याय निवडण्याच्या मन:स्थितीत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे महापौर करताना लांडे समर्थकाला संधी मिळेल का, याविषयी साशंकता आहे. नेत्यांनी अजितदादांशी फारकत घेतली असल्याने बोकड व सुपे यांच्या महापौरपदावर प्रश्नचिन्ह आहे. मात्र, अन्य कोणताही पर्याय नसल्याने याच नावापैकी एकावर शिक्कामोर्तब करावे लागणार आहे. महापौर तूर्त राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत नाहीत. मात्र त्यांना मुदतवाढ देण्याइतके त्यांचे काम प्रभावी नाही. आला दिवस पुढे ढकलण्याशिवाय त्यांनी काही केले नाही. येत्या काही दिवसांत महापौरपदावरून राजकारण रंगणार आहे. अजित पवार यांचा निर्णय अंतिम असून त्याकडे सर्वाचे लक्ष आहे.