बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या आणखी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. दादर रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी या तरुणाने दिली होती. पुणे रेल्वे सुरक्षा दलाने व्हॉट्सअ‍ॅपचा प्रभावी वापर करीत या तरुणाला धावत्या रेल्वेमध्येच जेरबंद केले.
सागर राजेंद्र नकाते (वय २३, रा. दासवे वस्ती, उरुळी कांचन) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी पुणे रेल्वे सुरक्षा दलाला वरिष्ठांकडून एक संदेश मिळाला. बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा आरोपी हैदराबाद एक्स्प्रेसने पुण्याला येत असल्याचे त्यात म्हटले होते. या संदेशासह आरोपीच्या मोबाइल क्रमांकावरून मिळालेले व्हॉट्सअ‍ॅपवरील छायाचित्रही पाठविण्यात आले होते.
आरोपीचा मोबाइल हैदराबाद एक्स्प्रेसमध्ये असल्याचे तांत्रिक माहितीवरून समजले. त्याचे छायाचित्र तपास पथकांनी सर्वाना तातडीने व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठविले. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांशी संपर्क साधून तपास पथकाने खडकी येथे रेल्वे थांबवली व शोध घेतला असता नकाते पोलिसांच्या हाती लागला. पुढील चौकशीसाठी त्याला लोणी कारभोर पोलिसांकडे देण्यात आले आहे.