उत्पादकाकडून थेट सामान्य ग्राहकाला आणि शेतातून थेट घरात, या धर्तीवर आता ग्रंथव्यवहारामध्येही प्रकाशकाकडून वाचकांना थेट सवलत मिळणार आहे. सांस्कृतिक फराळाने दीपावलीचा आनंद द्विगुणित करणाऱ्या ‘अक्षरधारा’च्या ‘दीपावली शब्दोत्सव’ या प्रदर्शनामध्ये ग्रंथखरेदी करणाऱ्या वाचकांना प्रकाशकांकडून २० टक्क्य़ांपासून ते ७० टक्क्य़ांपर्यंत थेट सवलत मिळणार आहे.
ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते गुरुवारी (२९ ऑक्टोबर) दीपावली शब्दोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर प्रसिद्ध अनुवादिका उमा कुलकर्णी या डॉ. भैरप्पा यांची मुलाखत घेणार आहेत. एस. एम. जोशी सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. अक्षरधाराच्या दीपावली शब्दोत्सवासाठी राजहंस प्रकाशन, मांडके हिअिरग सव्र्हिसेस यांचे सहकार्य लाभले असून या ग्रंथप्रदर्शनानिमित्त विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या ‘टाटायन’ या पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशन रविवारी (१ नोव्हेंबर) उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. टिळक स्मारक मंदिर येथे सकाळी साडेअकरा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात राहुल सोलापूरकर गिरीश कुबेर यांची मुलाखत घेणार आहेत, अशी माहिती अक्षरधाराचे रमेश राठिवडेकर आणि रसिका राठिवडेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. आचार्य अत्रे सभागृह येथे २२ नोव्हेंबपर्यंत दररोज सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळात सुरू राहणाऱ्या या ग्रंथप्रदर्शनात वाचकांना पुस्तक खरेदीवर थेट प्रकाशकांकडूनच सवलत मिळणार आहे.
तीनशेहून अधिक प्रकाशकांची एक लाखांहून मराठी, हिंदूी, इंग्रजी पुस्तके, अडीचशेहून अधिक दिवाळी अंकांचे खास दालन, ‘शंभर नंबरी साहित्य सोनं’ हा लोकप्रिय पुस्तकांचा विभाग, साहित्यविषयक सीडी, डीव्हीडी, कॉफी मग, बुकमार्क, शबनम बॅग ही या प्रदर्शनाची वैशिष्टय़े आहेत. रामकृष्ण मठ, गीता प्रेस, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकादमी आणि बालभारती यांची स्वतंत्र दालने समाविष्ट आहेत.