लष्करी हद्दीतून जाणाऱ्या दापोडी-बोपखेल रस्त्याची मागणी करणाऱ्या रहिवाशांना पोलिसांनी अमानुष मारहाण केली असतानाही पोलिसांच्या त्या कृतीचे शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी समर्थन केल्याप्रकरणी बोपखेलच्या ग्रामस्थांनी आमदारांचा निषेध केला आहे.
शिक्षण मंडळाचे सदस्य व बोपखेलचे रहिवाशी चेतन घुले यांनी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन प्रसिध्दीस दिले आहे. एके काळी शिवसेनेचे खासदार राहिलेले गजानन बाबर यांनी हा रस्ता खुला करण्यासाठी आंदोलन केले. आता मात्र केंद्रात व राज्यात सत्तास्थानी असलेल्या शिवसेनेच्या आमदारांना ग्रामस्थांऐवजी पोलिसांचा पुळका आला आहे. नागरिकांवर पोलिसांनी लावलेले दंगलीचे गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी आमदार त्यांना दोषी ठरवू पाहात आहेत म्हणून त्यांचा निषेध केल्याचे घुले यांनी म्हटले आहे.