दलितांच्या आरक्षणाला धक्का न लावता ब्राम्हण, मराठा समाजाला पंचवीस टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय-रिपाइं) अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे दिली. ब्राम्हण समाजाला आरक्षण नसल्यामुळे ते परदेशात जात असतील तर त्यांनी आरक्षण घ्यावे आणि देशातच राहावे अशी प्रतिक्रियाही आठवले यांनी दिली.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची रविवारी येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. उपमहापौर नवनाथ कांबळे, शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, एम. डी. शेवाळे, हनुमंत साठे आदी यावेळी उपस्थित होते. ‘ब्राम्हण समाजाला आरक्षण नसल्यामुळे या समाजातील मुले परदेशात जात आहेत, असे विधान  महापौर मुक्ता टिळक यांनी नुकतेच केले होते. त्या संदर्भात आठवले म्हणाले की, ब्राम्हण समाजासह मराठा आणि अन्य उच्च वर्णियांना आरक्षण मिळावयास हवे. तशी मागणी यापूर्वीच मी केली आहे. त्यासाठी कोणाच्या आरक्षणाला धक्का लावण्याची आवश्यकता नाही. ‘निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या उमेदवारास निवडून द्यायचे याचा निर्णय मतदार घेतात. रिपाइं ज्या पक्षाची मैत्री करते त्या पक्षाच्या उमेदवारास दलितांची मते मिळतात. मात्र इतर समाजाची मते दलित उमेदवारास मिळत नाहीत. रिपाइंमध्ये सर्व जातीधर्माच्या लोकांचा समावेश आहे. मात्र निवडणुकीत या सर्वाची मते उमेदवाराला मिळत नाही. त्यामुळे यापुढे रणनीतीमध्ये बदल करावा लागेल. मित्र पक्षांवरील अवलंबित्वही कमी करावे लागणार असून पक्षाचे  जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी गावपातळीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यात येईल,’ असेही आठवले यांनी स्पष्ट केले.

राणेंनी भाजपमध्ये यावे

काँग्रेस पक्षाचे नेते नारायण राणे भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची आवश्यकता आहे. या पक्षात त्यांना चांगले भविष्य राहील, माझा त्यांना मित्रत्वाचा सल्ला आहे. पुढील किमान वीस वर्षे केंद्रात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता येणार नाही असा दावाही त्यांनी केला.