पंचवीस हजारांची लाच घेताना अधिकाऱ्यांना अटक

प्रदूषणासारख्या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होत असताना शासकीय पातळीवर त्यावर नियंत्रण आणण्याची व कठोर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळातच लाचखोरीचे ‘प्रदूषण’ असल्याचे गुरुवारी समोर आले. औद्योगिक वसाहतीतील धोकादायक कचरा वाहतूक करण्याच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी पंचवीस हजाराची लाच घेताना मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी, क्षेत्र अधिकारी व त्यांच्या मध्यस्ताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

उपप्रादेशिक अधिकारी डॉ. प्रकाश प्रभाकर मुंढे, क्षेत्र अधिकारी संदीप बाबूराव शिंदे, मध्यस्थ सूर्यकांत सामंत यांना लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात तक्रार दिलेल्या व्यक्तीकडे औद्योगिक वसाहतीतून धोकादायक कचऱ्याची वाहतूक करण्याचा परवाना आहे. हा कचरा वाहून नेण्यासाठी त्यांच्याकडे ट्रकही आहेत. हा कचरा वाहतूक करण्यासाठी परवान्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आहे. परवान्याची मुदत संपल्याने त्याचे नूतनीकरण करण्यासाठी संबंधिताने त्यासाठी मंडळाकडे ऑनलाइन अर्ज सादर केला होता.

परवान्यासंबंधी पडताळणी करून त्याचे नूतनीकरण करून देण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वाकडेवाडी येथील कार्यालयातील अधिकारी मुंढे व शिंदे यांनी अर्जदाराकडे पंचवीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. नूतनीकरणाबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण असताना लाच मागितली जात असल्याबद्दल अर्जदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. बुधवारी या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात अधिकारी लाच स्वीकारणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वाकडेवाडी येथे पुणे- मुंबई रस्त्यावर सापळा लावण्यात आला. त्या ठिकाणी दोन अधिकाऱ्यांच्या वतीने लाच स्वीकारणाऱ्या सूर्यकांत सामंत याला रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक करण्यात आली.