सर्वसामान्य नागरिकांच्या तिकिटांवर डल्ला; यंत्रणेअभावी कारवाई शून्य

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रामध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आल्याने रेल्वे तिकिटांच्या दलालांनी शहरांतर्गत रेल्वे आरक्षण केंद्राकडे मोर्चा वळविला आहे. या केंद्रांमध्ये दलालांना रोखण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने दलाल मोकाट सुटले असून, सर्वसामान्य नागरिकांच्या तिकिटांवर डल्ला मारला जात आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरील तिकीट आरक्षण खिडक्यांवर दोन वर्षांपूर्वी दलालांचे राज्य होते. प्रवाशांची लुबाडणूक करणाऱ्या या दलालांबाबत तक्रारी वाढू लागल्यानंतर रेल्वे प्रशासनाने विविध उपाय राबवण्यास सुरुवात केली. वारंवारआरक्षण खिडक्यांच्या रांगेत उभ्या राहणाऱ्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने नजर ठेवणे सुरू झाले. त्यातून काहीसा फरक पडला. त्यानंतर आरक्षणासाठी येणाऱ्या व्यक्तीच्या हाताच्या पंजाचा ठसा घेणारे यंत्र बसविण्यात आले. त्यामुळे एकाच दिवशी दोनदा किंवा दररोज आरक्षणासाठी येणाऱ्या व्यक्तींची ओळख करणे शक्य झाले. या सर्व प्रकारांमधून मुख्य स्थानकातील आरक्षण केंद्र दलालांच्या तावडीतून बहुतांश प्रमाणात मुक्त झाले.

परंतु, हे दलाल आता शहरातील विविध भागांतील तिकीट आरक्षण केंद्राकडे वळले आहेत. लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, रविवार पेठ, शंकरशेठ रस्ता, कर्वे रस्ता, डेक्कन जिमखाना आदी भागातही रेल्वेचे शहरांतर्गत रेल्वे तिकिटांचे आरक्षण केंद्र आहेत. या केंद्रावरील तिकिटांचा काळाबाजार रोखण्याची कोणतीही यंत्रणा नाही. सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत नियमित तिकिटे दिली जातात. सकाळी ११ ते १२ या काळात द्वितीय श्रेणी व स्लीपर कोचची तत्काळ तिकिटे दिली जातात. सकाळी १० ते ११ या वेळेत प्रथम श्रेणी व इतर श्रेणीची तत्काळ तिकिटे दिली जातात. या सर्व वेळांमध्ये आरक्षण केंद्रांच्या खिडक्यांवर दलालांच्या मंडळींचेच राज्य असल्याचे दिसून येते. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या केंद्रावर नियमितपणे भेट देऊन तपासणी करणे आवश्यक असते. त्या प्रमाणे भेटीही दिल्या जातात व तपासणीचे सोपस्कारही केले जातात. मात्र, त्यातून दलालांवर आजवर कोणताही अंकुश निर्माण झाला नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

‘शहरांतर्गत रेल्वे आरक्षण केंद्रांत दलालांचे राज्य आहे. त्यावर पुणे रेल्वे स्थानकाप्रमाणेच ठोस उपाययोजना हवी. तिकीट घेताना ओळखपत्र सक्तीचा रद्द केलेला निर्णय रेल्वेने मागे घ्यावा. ओळखपत्र पुन्हा सक्तीचे करावे. त्याचप्रमाणे तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी सर्वच आरक्षण खिडक्यांवर ‘फोटो डिक्टेटर’ लावण्याची योजना रेल्वेने जाहीर केली आहे. या योजनेची तातडीने अंमलबजावणी करून सर्वसामान्यांना दलालांच्या तावडीतून मुक्त करावे.’

– हर्षां शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप

 

आरक्षणाच्या रांगेत भिकारी

तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल आरक्षणाच्या रांगेत उभे राहण्यासाठी भिकाऱ्यांचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे. सकाळी आठ वाजता आरक्षण सुरू होत असल्याने पहाटे किंवा रात्रीपासूनच आरक्षण केंद्राच्या रांगेत या मंडळींना थांबविले जाते. सकाळी आरक्षणाचा अर्ज व पैसे घेऊन आलेले दलाल या भिकाऱ्यांच्या जागी रांगेत थांबून तिकिटांचे आरक्षण करीत असल्याचे दिसून येते.