महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे आदेश; मार्गामुळे पिंपरीतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत

पिंपरी पालिकेच्या वतीने आठ वर्षांपूर्वी काम सुरू झालेला निगडी ते दापोडी दरम्यानचा बीआरटी मार्ग अद्याप सुरू होऊ शकलेला नाही. ‘मेट्रो’च्या कामामुळे पिंपरीत होणाऱ्या वाहतूक कोंडीवरील उपाय म्हणून हा मार्ग सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सप्टेंबर महिनाअखेरीपर्यंत या मार्गावरील सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात हा मार्ग सुरू करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.

पिंपरी पालिकेच्या नियोजनानुसार शहरात चार ठिकाणी बीआरटी मार्ग आहेत. त्यापैकी सांगवी ते किवळे आणि नाशिक फाटा ते वाकड हे दोन मार्ग सुरू झालेले आहेत.  मुंबई-पुणे महामार्गावरील १२ किलोमीटर अंतराचा महत्त्वाचा निगडी ते दापोडी हा मार्ग तयार असूनही सुरू होऊ शकलेला नाही. या मार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्तता करण्यात आलेल्या नाहीत, असा आक्षेप घेत अनेक संस्था, संघटनांनी आंदोलने केली आहेत. काही लोकप्रतिनिधींही हा मार्ग धोकादायक असल्याचे मत मांडले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या मार्गावरील बसथांबे डाव्या बाजूला असावेत की उजव्या बाजूला, याविषयीचा वाद न्यायप्रविष्ट आहे. या सर्व कारणांमुळे हा मार्ग सुरू करण्याचे धारिष्टय़ महापालिकेने दाखवले नाही.

बीआरटी मार्गामुळे मुख्य रस्ता अरुंद झाला आहे. वाहनांची संख्या मुळातच अधिक आहे. रस्ता छोटा झाल्याने वाहतुकीची कोंडी वाढल्याचे दिसून येत होते. त्यासाठी उपाय म्हणून काही दिवसांपूर्वी बीआरटी मार्गातून दुचाकी वाहनांना परवानगी देण्यात आली होती. पिंपरीतील मेट्रो प्रकल्पाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. यापुढे हे काम वाढत जाणार असून वाहतूक कोंडींची झळ नागरिकांना बसणार आहे. त्यापूर्वीच बीआरटी मार्ग सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. गेल्या काही दिवसांपासून हे रखडलेले काम मार्गी लावण्याच्या वेगवान हालचाली दिसून येत आहे.