बाहेर ‘कॅशलेस’च्या जाहिराती, आतमध्ये रोकडशिवाय काम नाही

केंद्र व राज्य शासनाकडून रोकडशिवाय व्यवहार करण्याचा नारा दिला जात असताना शासकीय दूरसंचार कंपनी असलेली बीएसएनएल मात्र ग्राहकांकडून रोख रक्कमच स्वीकारत असल्याचे चित्र आहे. ग्राहकांकडून कार्डद्वारे रक्कम घेण्यासाठी त्यांच्याकडे स्वाइप मशिनही उपलब्ध नाही. विशेष म्हणजे बीएसएनएलच्या कार्यालयांबाहेर आता रोकडरहित व्यवहार करण्याच्या जाहिराती झळकत असल्या, तरी आतमध्ये मात्र रोख रक्कम असल्याशिवाय कामच होत नसल्याचे दिसून येते.

[jwplayer gSSKhmYu]

नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनटंचाई निर्माण झाली असल्याने मुळातच नागरिकांकडे रोख रक्कम कमी आहे. आता शासनाने रोकडरहित व्यवहारावर भर देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. डेबीट किंवा क्रेडीट कार्ड असलेल्या नागरिकांकडून सध्या विविध ठिकाणी कार्ड पेमेंट केले जात आहे. परिस्थिती लक्षात घेता अगदी छोटय़ा- मोठय़ा दुकानदारांपासून भाजीविक्री करणाऱ्या मंडळींनीही स्वाइप मशिन ठेवल्या असून, कार्ड पेमेंटद्वारे ते पैसे घेत आहेत. मात्र, शासकीय दूरसंचार कंपनी असलेल्या बीएसएनएलमधील परिस्थिती शासनाच्या ‘कॅशलेस’ आवाहनाच्या एकदम विपरीत आहे. अनेक नागरिकांना सध्या त्याचा अनुभव येतो आहे. ‘बीएसएनएल’च्या कार्यालयात बिल भरणा करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या योजना घेण्यासाठी गेल्यास कार्डद्वारे रक्कम स्वीकारली जात नाही. कार्ड स्वाइप करण्याचे यंत्रच त्यांच्याकडे नसल्याने कार्डद्वारे काम होणार नसल्याचे सुरुवातीलाच सांगितले जाते. त्यामुळे केवळ कार्डवर अवलंबून असणाऱ्यांना काम न होताच परतावे लागत आहे. जुन्या पाचशेच्या नोटा बीएसएनएलकडून स्वीकारल्या जात आहेत. मात्र, कार्यालयांकडे पुरेसे सुटे पैसे नसल्याने समस्या निर्माण होत आहेत. त्याचा फटकाही शेवटी ग्राहकालाच सहन करावा लागत आहे.    कार्यालयाच्या आवारामध्ये कॅशलेसच्या जाहिराती झळकत असताना शासकीय संस्थेमध्येच कॅशलेसबाबत व्यवस्था नसल्याबाबत संताप व्यक्त करण्यात येतो आहे.

[jwplayer TzwZQwr9]