केंद्रीय अर्थसंकल्पात पुणे मेट्रो प्रकल्पाला दिलासा मिळाला असून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पुणे मेट्रो प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात १२६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकातही मेट्रो प्रकल्पासाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली असून पुणे मेट्रोला आता केंद्राची मान्यता मिळण्याची प्रक्रिया बाकी आहे.
पुणे मेट्रो प्रकल्प गेली काही वर्षे चर्चेत असला, तरी या प्रकल्पाला केंद्राकडून प्रत्यक्ष निधीची तरतूद झालेली नव्हती. यंदा मात्र केंद्रीय अर्थसंकल्पात १२६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी जाण्यापूर्वी पुणे मेट्रो प्रकल्प पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डापुढे (पीआयबी) सादर केला जाणार आहे. पीआयबीच्या मंजुरीनंतर हा प्रकल्प मंत्रिमंडळापुढे जाईल. केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अद्याप मिळालेली नसल्यामुळे अर्थसंकल्पात मेट्रोसाठी निधीची तरतूद होईल का याबाबत काहीशी अनिश्चितता होती. मात्र अर्थमंत्र्यांनी पुणे मेट्रोसाठी तरतूद केल्यामुळे आता केंद्राची मान्यता मिळणे हा टप्पा बाकी आहे.
महापालिकेचे अंदाजपत्रकही शुक्रवारी स्थायी समितीमार्फत मुख्य सभेला सादर करण्यात आले आणि त्या अंदाजपत्रकातही मेट्रो प्रकल्पासाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मेट्रोला केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशन ही स्वतंत्र कंपनी स्थापन केली जाईल. या कंपनीच्या स्थापनेसाठी ज्या आवश्यक गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे, त्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. पुणे मेट्रो प्रकल्पात पहिल्या टप्प्यात वनाझ (कोथरूड) ते रामवाडी (नगर रस्ता) आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड असे ३२ किलोमीटर लांबीचे दोन मार्ग प्रस्तावित आहेत.