पुण्यातील कोंढवा भागात असलेल्या भाग्योदयनगर परिसरात आज संध्याकाळी सातच्या सुमारास दोन मजली बंगल्याचे नुतनीकरण सुरू असताना शेजारच्या घरावर या बंगल्याच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. या घटनेत दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील भाग्योदय नगरमध्ये दुमजली घराचे नुतनीकरण सुरू होते. मात्र अचानक या घराच्या दुसऱ्या मजल्यावरचा काही भाग शेजारच्या घरावर कोसळला. यामुळे घराचा पत्रा मोडून हा बांधकामाचा भाग इंदूबाई त्रिपाठी आणि जयश्री भालशंकर या दोन महिलांच्या अंगावर पडला. या घटनेत या दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.