‘ओएलएक्स’वरील जाहिरातीच्या आधारे पेईंग गेस्ट म्हणून आला आणि चक्क ३७ हजार रुपयांची घरफोडी करून घरमालकालाच लुटून गेल्याची घटना उघडकीस आली. या ओएलएक्सवीराला ११ दिवसांनी पकडण्यामध्ये पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गोरखनाथ ऊर्फ अर्जुन दादासाहेब वाघ (वय २०, गहनीप्रसाद सोसायटी, वकीलनगर, एरंडवणे, मूळगाव हारशी खुर्द, तेली गल्ली, पैठण, जि. औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या चोरटय़ाचे नाव आहे. त्याच्याकडे झडती घेतली असता २५ हजार रुपये किमतीचा कॅनन कंपनीचा डिजिटल कॅमेरा, १२ हजार रुपये किमतीचा एचपी कंपनीचा लॅपटॉप, इन्टेक्स कंपनीचे स्पीकर आणि निळ्या रंगाची बॅग असा ऐवज चोरला असे निष्पन्न झाले. हा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
कोथरूड येथील अमित सिंग यांना मागील महिन्यात एक पेईंग गेस्ट हवा होता. त्यासाठी त्यांनी ओएलएक्सवर जाहिरात टाकली. ही जाहिरात वाचून गोरखनाथ हा सिंग यांच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहण्यासाठी आला. मात्र, ३० सप्टेंबर रोजी त्याने आपल्या घरमालकाच्याच घरी चोरी केली. या आरोपीला ११ दिवसांनंतर पोलिसांनी जेरबंद केले. माहिती तंत्रज्ञानाचा असाही लाभ घेतलेल्या या गुन्ह्य़ाविषयी पोलिसांमध्येही चर्चा रंगली.