‘आयर्न बट असोसिएशन’ ही अमेरिकेतील नामांकित बाइक असोसिएशन. या संस्थेचा विक्रम नावावर असणे हे खऱ्याखुऱ्या बाइक रायडरचे स्वप्नच! एका दमात सलग २४५० किलोमीटरचा टप्पा पार करण्याचा ‘बट बर्नर’ हा खडतर विक्रम ही तर या संस्थेची ओळखच. हा प्रवास ३५ तासांत पूर्ण केल्याचा विक्रम अमेरिकेच्या ग्रुपच्या नावावर आहे. तो मोडण्यासाठी पुण्यातील पाच युवकांचा गट सज्ज झाला असून, ते पुणे-चेन्नई-पुणे हा २४५० किलोमीटरचा प्रवास एका दमात पूर्ण करणार आहेत. त्याची सुरुवात शनिवारी (२८ फेब्रुवारी) दुपारी पुण्यातून होणार आहे.
पुण्यातील ‘फ्री सोल्स’ या ग्रुपचे युवक या मोहिमेवर जात आहेत. विशेष म्हणजे असे खडतर विक्रम स्पोर्ट्स बाइकवर केले जातात. हे युवक तो रॉयल एनफिल्ड बाइकवर करणार आहेत. या मोहिमेचे नेतृत्व रोहन पानघंटी करणार आहे. त्याच्यासोबत विनिल खारगे, संग्राम शेलार, स्वप्निल उखांडे, अमित चव्हाण हे सदस्य सहभागी होणार आहेत. ते येत्या शनिवारी दुपारी ३ वाजता वाकड येथील रॉयल एनफिल्डच्या दालनापासून या मोहिमेला सुरुवात करणार आहेत. ‘फ्री सोल्स’ या ग्रुपने गेल्या महिन्यात रोहन पानघंटी याच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगळुरू-पुणे हा १६४२ किलोमीटरचा बाइक प्रवास २२ तास २३ मिनिटांत पूर्ण केला. त्याद्वारे त्यांनी ‘सॅडल सोर’ हा किताब पटकावला. त्यानंतर आता हा आणखी खडतर प्रयत्न केला जाणार आहे.
‘वर्ल्ड्स टफेस्ट रायडर’ बनण्यासाठी!
‘‘आम्ही सलग २४५० किलोमीटरचा प्रवास बाइकवर पूर्ण करण्याची धडपड का करत आहोत, असे सर्व जण विचारतात. त्याचे कारण आहे, ‘आयर्न बट असोसिएशन’ या अमेरिकेतील नामांकित संस्थेकडून दिला जाणारा किताब. हा प्रवास यशस्वी रीत्या पार केल्यास ही संस्था ‘वर्ल्डस टफेस्ट रायडर’ हा किताब बहाल करतो. ते माझ्यासारख्या अनेक बायकर्सचे स्वप्न असते. त्यासाठीच ही आमची धडपड आहे. त्यासाठी आमच्या ‘फ्रो सोल्स’ ग्रुपचे सदस्य आणि किंग अॅटो रायडर्सचे संतोष माने, स्वप्निल बालवडकर यांच्याकडून मोठे प्रोत्साहन मिळाले आहे.’’
– रोहन पानघंटी, बट बर्नर मोहिमेचा नेता